नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ऑगस्ट-2023 मध्ये तिसरी चांद्रमोहीम प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहे. ‘चांद्रयान-3’द्वारे अधिक सक्षम चंद्र रोव्हर वाहून नेले जाणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली. ‘जीएसएलव्ही एमके3’ या प्रक्षेपकाच्या सहाय्यानेच हे प्रक्षेपण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘चांद्रयान-3’प्रमाणेच इस्रो गगनयान मोहिमेवर देखील काम करत आहे. ही मोहीम नवीन वर्षाच्या प्रारंभी अपेक्षित असल्याचेही ते पुढे म्हणाले. ‘चांद्रयान-3’ मोहीम पूर्वी 2022 च्या तिसऱया तिमाहीत सुरू होणार होती. परंतु हे प्रक्षेपण आता पुढे ढकलण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे लँडिंग करण्याची भारताची क्षमता सिद्ध होणार असल्याने चांद्रयान-3 मोहीम इस्रोसाठी महत्त्वपूर्ण आहे.