Tarun Bharat

नेतृत्वबदल की चालढकल?

कर्नाटकात नेतृत्वबदलाच्या चर्चेने पुन्हा उचल खाल्ली आहे. मंगळूर येथील भाजप कार्यकर्ता प्रवीण नेट्टारूच्या खुनानंतर कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱयांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे उद्भवलेली परिस्थिती सध्या सावरली असली तरी आगामी निवडणुकीत नवा चेहरा लोकांसमोर घेऊन जाण्यासाठी नेतृत्वबदल अटळ आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे माजी आमदार बी. सुरेशगौडा यांनी या चर्चेला तोंड फोडले. काँग्रेस नेत्यांनी व्यवस्थितपणे हाच धागा पकडून ट्विटरवरून अभियान सुरू केले. भाजप राजवटीला लवकरच तिसरा मुख्यमंत्री नेमावा लागणार आहे, असा प्रचार काँग्रेस नेत्यांनी सुरू केला आहे. दोन दिवस कर्नाटकात चर्चेचे गुऱहाळ सुरू आहे. बुधवारी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी या चर्चेत उडी घेतली असून बसवराज बोम्माई हेच मुख्यमंत्री असतील, असे जाहीर करीत मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे.

गेल्या आठवडय़ात 4 ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटक दौऱयावर आले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची वाटचाल कशी असावी, याचे मार्गदर्शन त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना केले आहे. याच वेळी अमित शहा यांनी येडियुराप्पा यांचीही स्वतंत्र भेट घेऊन चर्चा केली आहे. सात-आठ महिन्यात निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत समाजमन अस्वस्थ राहणे कोणाच्याच फायद्याचे नाही. विकासाच्या मुद्दय़ावर मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सल्ला अमित शहा यांनी दिला आहे.

सध्या कर्नाटकात सुरू असलेला जातीय तणाव कमी करून विकासाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जाण्याचा कानमंत्र त्यांनी आपल्या नेत्यांना दिला आहे. गुजरातबरोबर कर्नाटकातही निवडणुका घेतल्यास भाजपला अनुकूल राहणार आहे का, या मुद्दय़ावरही चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. सद्यपरिस्थितीत अनुकूल वातावरण नाही, असेच येडियुराप्पा यांनी आपल्या पक्षनेतृत्वाला सांगितले आहे.

गेल्या महिन्यात बसवराज बोम्माई यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मोठय़ा प्रमाणात उत्सव साजरा करण्याआधीच हिंदू कार्यकर्त्याची हत्या झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या दबावामुळे वर्षपूर्ती कार्यक्रम रद्द करावा लागला. 3 ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस झाला. यानिमित्त काँग्रेसने दावणगेरी येथे शक्तीप्रदर्शन केले. 10 ते 15 लाख लोकांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. या कार्यक्रमानंतर भाजपच्या गोटातील हालचाली वाढल्या आहेत. निमित्त वाढदिवसाचे असले तरी सिद्धरामय्या यांनी आपले शक्तीप्रदर्शन केले होते. या कार्यक्रमाला स्वतः राहुल गांधी उपस्थित होते. याला शह देण्यासाठी यापेक्षाही मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सत्ताधाऱयांनी सुरू केली आहे.

पक्ष आणि सरकार यांच्यात ताळमेळ ठेवण्याची सूचना अमित शहा यांनी केली आहे. यावरून हा ताळमेळ चुकला आहे, असाच अर्थ होतो. वयाचे कारण देऊन येडियुराप्पा यांना बाजूला सारण्यात आले. त्याचवेळी प्रामुख्याने मुख्यमंत्रिपदासाठी शोभा करंदलाजे हे नाव ठळक चर्चेत आले होते. आता बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे कर्नाटकात संघटनात्मक बदल करण्याचा विचार पक्षाने सुरू केला आहे. कोणत्याही परिस्थितीत वक्कलिगा समाजाला आपलेसे करून घेण्यासाठी वेगवेगळय़ा व्यूहरचना करण्यात येणार आहेत. या बदलाचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनाही बाजूला काढणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीला सात ते आठ महिने शिल्लक असताना भाजप हा प्रयोग करणार का? या प्रश्नाला राजकीय निरीक्षकांचे उत्तर ‘होय’ असेच आहे.

भाजपने अनेक राज्यात नेतृत्वबदलाचा धोका पत्करला आहे. बसवराज बोम्माई यांनी यापूर्वी पाटबंधारे व गृहखाते यशस्वीपणे सांभाळले आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक वर्ष पूर्ण केले असले तरी कार्यकर्त्यांना त्यांची कार्यपद्धत समाधानकारक वाटली नाही, असे दिसते. म्हणून नेतृत्वबदल झालाच तर राजकीय व भौगोलिक समीकरण लक्षात घेऊन वेगवेगळय़ा जातींची मते एकवटण्यासाठी नव्या नेत्यांची निवड करणार, हे स्पष्ट आहे. सध्या माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, खासदार रमेश जिगजिनगी, केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे ही नावे ठळक चर्चेत आहेत. माजी केंद्रीयमंत्री व विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ किंवा माजी मंत्री सी. टी. रवि यांच्यासारख्या कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांच्या हाती सत्तासूत्रे सोपविण्याची मागणी वाढली आहे. नेतृत्वबदलाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे जरी भाजप नेते म्हणत असले तरी अमित शहा यांच्या कर्नाटक दौऱयानंतर अनेक नेत्यांचे चेहरे पडले आहेत.

नेतृत्वबदलाची चर्चा काही काँग्रेसने सुरू केलेली नाही. भाजपचे माजी आमदार सुरेशगौडा यांनी या चर्चेला तोंड फोडले आहे. त्यानंतर काँग्रेसने याविषयी मोहीम सुरू केली आहे. लिंगायत, दलित व वक्कलिग समाजाच्या नेत्यांना प्रमुख पदावर नेमण्याचा विचार सुरू आहे. ‘मिशन-150’ गाठण्यासाठी कर्नाटकात प्रभावी नेतृत्वाची गरज आहे, याची निकड हायकमांडने ओळखली आहे. त्यामुळेच आश्चर्यकारक नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येऊ शकते. प्रदेशाध्यक्ष नळिनकुमार कटिल यांनाही बाजूला सारण्याचा विचार सुरू आहे. सध्या मुख्यमंत्री बदलाच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी असलेल्या काँग्रेसमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे.

स्वातंत्र्यदिनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, प्रसंगी मुख्यमंत्रीही बदलला जाणार ही चर्चा रंगत आहे. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला काढताना शेवटच्या दिवसापर्यंत भाजपचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंग यांचा धोशा सुरू होता, ‘येडियुराप्पाजी हेच आपले नेते आहेत. मुख्यमंत्रिपदावर तेच कायम राहतील’. आताही बसवराज बोम्माई यांच्याबाबत असाच धोशा सुरू आहे. स्वातंत्र्यदिनानंतर काय होणार, याकडे साऱयांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

जी-7 च्या शक्तिशाली गटात लवकरच भारताचा प्रवेश

Patil_p

आपण सारेच पोटार्थी !

Amit Kulkarni

खाशाबांचे वारस घडवा!

Patil_p

धारावीचा दिलासा!

Patil_p

काँग्रेसला दिलासा!

Patil_p

भारतातील घटते पर्जन्यवन

Amit Kulkarni