अंमलीपदार्थ व्यवहाराचा बिमोड करण्याचेही आव्हान
प्रतिनिधी /पणजी
साधारणतः सहा दशकांपूर्वी गोव्यात येणारे विदेश पर्यटक अर्थात ’हिप्पी’, यांच्याच माध्यमातून राज्यात अंमलीपदार्थ येत असल्याचे मानले जात होते. आता परिस्थिती बदलली आहे. विनाकष्ट बक्कळ कमाई करून देणारा व्यवसाय म्हणून परिचित झाल्यामुळे या अवैध धंद्यात स्थानिकही उतरले असून दिवसेंदिवस त्याचा पसारा वाढू लागला आहे. त्यातून केवळ पर्यटक हेच त्यांचे ग्राहक न राहता अत्यंत दुर्गम भागातसुद्धा त्याने हातपाय पसरले आहेत. कोवळ्या वयाचे विद्यार्थीसुद्धा त्या विळख्यात गुरफटू लागले आहेत. त्यामुळे हा विस्तार रोखणेही पोलिसांसमोर मोठे आव्हान बूनन राहिले आहे.
हा व्यवसाय गांजा आणि चरस एवढय़ापुरताच मर्यादित न राहता कोकेन, एलएसडी, एक्स्टसी गोळय़ा, एमडीएमए, हेरॉइन, मेथॅम्फेटामाइन, आदी नावांनी राज्यात सहजतेने अंमलीपदार्थ उपलब्ध होऊ लागले आहेत. किनारपट्टी भागात तर काही जणांनी स्वतःच्या घरात किंवा फ्लॅटमध्येही गांजाची शेती करण्यापर्यंत मजल मारली आहे. यातील कित्येकांना यापूर्वी अटकही झाली असून त्यात विदेशी नागरिकांचाही सहभाग दिसून आला आहे.
विदेशी पर्यटकांसह देशी लोकही दिल्ली, मुंबई यासारख्या बडय़ा शहरांमधून गोव्यात ड्रग्ज आणतात. असे लोक बहुतांशी रेल्वेचा वापर करतात हे यापूर्वी झालेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
विदेश पर्यटक पिकवतात गांजा
2018 मध्ये हणजुणे येथे एका रशियन दाम्पत्याने भाडय़ाच्या खोलीतच गांजा पिकवला होता. 2019 मध्येही अशाच आरोपाखाली चौघा रशियन नागरिकांना अटक करण्यात आली होती तर 2020 मध्ये मोरजी येथे आणखी एका रशियन नागरिकाने भाडय़ाच्या खोलीत गांजा पिकविल्याचे प्रकरण उजेडात आले होते. त्या सर्वांना अटक करण्यात आली होती.
सुमारे सहा दशकांपूर्वी गोव्यात येणाऱया पर्यटकांमध्ये विदेशी जास्त आणि देशी कमी असेच प्रमाण होते. त्याकाळी देशी पर्यटकांना अंमलीपदार्थाची ओळखही झाली नव्हती. हिप्पींमुळे अंमवी पदार्थ गोव्यात पोहोचले आणि तेव्हापासून गोवा हे अंमली पदार्थांचे आश्रयस्थान बनले आहे.
दिल्ली, मुंबईहून अधिक ड्रग्ज तस्करी
सध्यस्थितीत गोव्यात सर्वाधिक ड्रग्जची तस्करी दिल्ली आणि मुंबईतून होत असल्याचे दिसून आले असून हे ड्रग्ज रेल्वेतून येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गत 21 ऑगस्ट रोजी राज्य गुन्हे शाखेने दिल्लीहून टेनने आलेल्या एका नायजेरियन महिलेस अटक केली होती. तिच्या झडतीत 15,10,000 रुपये किंमतीचे ड्रग्ज सापडले. जे तिने सँडलमध्ये लपवून आणले होते.
अधिकृत नोंदीनुसार अशाप्रकारे 2017 मध्ये 168 प्रकरणे, 2018 मध्ये 222 प्रकरणे, 2019 मध्ये 219 प्रकरणे, 2020 मध्ये 148 प्रकरणे आणि 2021 मध्ये 121 प्रकरणे एनडीपीएस कायद्यांतर्गत नोंदवण्यात आली आहेत. त्याखाली गत 10 महिन्यांत 24 पेक्षा जास्त विदेशी नागरिकांना अटक केली असून, त्यात बहुतांश नायजेरियन आहेत. याच कालावधीत पोलिसांनी अंमलीपदार्थ तस्करीशी संबंधित सुमारे 116 जणांना अटक केली. त्यामध्ये 31 गोमंतकीय, 62 देशी आणि 24 परदेशी नागरिक होते. त्यांच्याकडून 140 किलोपेक्षा जास्त वजनाचे विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त केले. गत 26 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मुस्कान करूवा (19) या झारखंडमधील महिलेस 6 लाख रुपये किमतीच्या 6 किलो गांजासह अटक केली होती.
गोवा बनतोय ’नार्को-टुरिझम हॉटस्पॉट’
या सर्व व्यवहारांमुळे गोवा हे ’नार्को-टुरिझम हॉटस्पॉट’ म्हणून उदयास आले आहे. त्यात गत काही वर्षांपासून पॅसिनोंचीही भर पडल्यामुळे आजकालचे बहुतेक पर्यटक हे गोव्याचे सौंदर्य पाहण्यापेक्षा ड्रग्ज, दारू, जुगार आणि ’उपभोग’ या उद्देशानेच येतात हेही सिद्ध झाले आहे. आता नाताळ आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला खास करून किनारी भागात पोलिसांच्या साध्या वेशातील तुकडय़ा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.