40 देशांमधील 10 हजार विदेशी भाविकांकडून सेवा-दर्शन
मथुरा / वृत्तसंस्था
श्रीकृष्ण जन्माष्टमीला मथुरेतील सर्व मंदिरे भाविकांनी फुललेली दिसून येत होती. गोकुळाष्टमीच्या औचित्याने 20 लाख भाविक मथुरेत पोहोचल्यामुळे सर्व प्रमुख मंदिरांमध्ये गर्दी झाली होती. देशाच्या कानाकोपऱयांबरोबरच विदेशातूनही बरेच भाविक मथुरेत आले होते. युपेन, रशिया, अमेरिका, इटलीसह 40 देशांतील 10 हजार विदेशी भाविक येथे आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. विदेशातील बरेच भक्तगण ‘हरे राधा-हरे कृष्ण’चा जयघोष करत होते. तसेच बरेचजण सेवेमध्येही सहभागी झाले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही जन्माष्टमीनिमित्त मथुरेत पोहोचले होते.
कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून मथुरेतील कृष्णजन्म सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला होता. तथापि, यंदा कमी निर्बंध असल्यामुळे देश-विदेशातील हजारो भक्तगण सहभागी झाले होते. श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर परिसरात राधे-राधेचा जयघोष दिवसभर सुरू होता. तसेच वेगवेगळय़ा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. भक्तही भक्तीत तल्लीन झालेले दिसत होते. लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सुरक्षेसाठी मथुरा आणि वृंदावनची 5 झोन आणि 30 सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली होती.
मथुरा शहर उजळून निघाले
मथुरेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठय़ा दिमाखात साजरा केला जातो. शुक्रवारी सकाळपासूनच जन्मभूमीवर भाविकांची गर्दी होत होती. तर दुसरीकडे भक्तांसाठी ठिकठिकाणी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेश तीर्थक्षेत्र विकास परिषदेने पुढाकार घेत शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सजावट व रोषणाई केली होती. श्रीकृष्ण जन्मस्थानाव्यतिरिक्त मथुरा-वृंदावनातील प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मथुरेतील मंदिरांमध्ये भव्य सजावटीसोबतच भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिर परिसराकडे जाणाऱया रस्त्यांवर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.