ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Chanting of ‘Pakistan Zindabad’ in Pune टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएने देशभरात केलेल्या कारवाईविरोधात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर’, ‘अल्ला हू अकबर” अशा ‘घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. याप्रकरणी आंदोलनात सहभागी झालेल्या 60 ते 70 कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा, खुर्द) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
अधिक वाचा : पुण्यात मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा
मिळालेल्या माहितीनुसार, पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमाव जमा करून आंदोलन केले. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि ईडीने पीएफआयच्या अनेक नेत्यांना अटक केली. या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधी घोषणा देताना ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर’, ‘अल्ला हू अकबर’च्याही घोषणा दिल्या.
इस्लामिक संघटना म्हणून नावारूपास आलेल्या पॉप्युलर प्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित कार्यालय, व्यक्ती आणि महत्वपूर्ण ठिकाणांवर गुरुवारी सकाळी राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणा आणि स्थानिक पोलीस यांनी छापे टाकले होते. देशभरातील 12 राज्यात ही कारवाई करण्यात आली होती. महाराष्ट्रात नवी मुंबई, भिवंडी, पुणे, नाशिक, कोल्हापूर, परभणी, औरंगाबाद, नांदेड आदीठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. पुण्यातून दोघांना अटक करण्यात आली होती. तर राज्यातून तब्बल 20 जणांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत मोठय़ा प्रमाणात महत्त्वपूर्ण कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक डेटा जप्त करण्यात आले होते. पुण्यातून पीएफआयचे कोंढवा भागातील कार्यकर्ते रजी खान आणि अब्दुल कय्याम शेख यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.