Tarun Bharat

दान, शौर्य, सत्य आणि शौच

अध्याय एकोणिसावा

शम दम, धृती आणि तीतीक्षा याबद्दल सविस्तर सांगून झाल्यावर भगवंत पुढे म्हणाले, सर्वांना अभय देणे हेच परम ‘दान’ आहे. कामनांचा त्याग म्हणजेच ‘तप’. आपल्या वासनांवर विजय मिळवणे म्हणजेच ‘शूरता’ समदर्शन हे ‘सत्य’ होय. कोणत्याही प्राण्याला दुःख देऊ नये, म्हणजेच त्यांना सुख द्यावे हे सहजच आले. सर्वांना सुख देणे हेच ‘महादान’ होय.

प्राणिमात्रांचे दुःख निवारण करून सर्वांना सुख देणे हेच उत्तमातील उत्तम दान होय. ह्याच्या तोडीचे दुसरे दान पृथ्वीतलावर दुसरे नाही. उद्धवा! जन्ममरणाचे दुःख निवारण करून आत्मसुखाचा लाभ करून देणे ह्याचेच नांव ‘अलौकिक दान’ होय, हे लक्षात ठेव. उद्धवा! ह्याचेच नाव खरोखर ‘परम दान’ असे तू निश्चित समज. आता तपाचे लक्षण ऐक, तेही तुला सांगतो. सर्व कामनांचा त्याग करून जे तप करणे, तेच अत्युत्कृष्ट तप होय.

अंतःकरणात कामरूप अग्नि असला तर ते तपाचे लक्षण शोभत नाही. पोटी वासना ठेवून जो अरण्यात तपाला जातो, तो तेथेही स्त्रीचंच ध्यान करूं लागतो. मनात कामवासना असल्यामुळे ते तपच त्याला बाधक होते. कामाची वासना निखालस टाकून दिली, तरच उत्तम तप हातून घडते. अखंड माझेच स्मरण लागून राहते. ह्याचेच नाव शुद्ध तपसिद्धी.

अनुतापपूर्वक मत्स्वरूपी चित्त लागणे ह्याचंच नाव ‘शुद्धतप’ होय किंवा माझे चित्स्वरूप हृदयामध्ये चिंतन करणे हेच सर्व तपांमध्ये ‘श्रे÷तप’ होय. आता शौर्याचा विचार ऐक, समरांगणामध्ये बलाढ्य़ शत्रूला मारून शत्रूची सेना जिंकून टाकतो, तसला शूर येथे उपयोगाचा नाही, तर प्रवाहरूपाने जो जीवभाव आपल्यामागे अनिवारपणे लागलेला आहे, त्याला जो महावीर जिंकून टाकतो, त्यालाच खरा ‘शूर’ असे म्हणावयाचे. “मी नेहमी सदाचरणानेच चालत असतो, मी निःसंदेह ज्ञानी आहे, माझा देह पवित्र आहे ’’ हाच जीवाचा ‘जीवभाव’ होय. देहाच्या माथ्यावर वर्णाश्रम, आश्रमाच्या माथ्यावर कर्म, त्या कर्माचा ज्याला अतिशय अभिमान, त्याला अनिवार देहभ्रम असतो. ह्याकरिता जीवस्वभावाला जिंकून चिदानंदाच्या राज्यावर बसून, आपल्या आत्मरूप स्वराज्यवैभवाचे सुख भोगणे, हेच शुराचे गौरवचिन्ह म्हणजे मोठेपण होय. आता ज्याला ‘सत्य’ म्हणून म्हणतात, तेही सविस्तरपणे तुला सांगतो. उद्धवा! सदासर्वदा सर्वत्र समब्रह्म पाहणे तेच ‘परम सत्य’ होय. परब्रह्म सर्वत्र समान भरलेले न पाहता जिकडे तिकडे विषम म्हणजे भिन्न भिन्न पाहणे तेच अत्यंत दुर्गम असे ‘असत्य’ होय. आणि ब्रह्म हे सर्वव्यापक असून सर्वत्र सम आहे असे समजणे हेच ‘सत्य’ होय.

सारांश, नुसते सत्यभाषण हे काही निज सत्य नव्हे. मधुर भाषणाला महात्म्यांनी ‘ऋत’ म्हटले आहे. कर्मांमध्ये आसक्त न होणे म्हणजेच ‘पावित्र्य’, कामनांचा त्याग हाच ‘संन्यास’. कित्येक ज्ञाते लोक ‘ऋत’ ह्यालाच सत्य असे म्हणतात. ते प्रवृत्तीच्या दृष्टीने पाहता खरे आहे. परंतु निवृत्तीच्या दृष्टीने पाहता सम ब्रह्मालाच ‘सत्य’ म्हणणे योग्य आहे.

येथे ‘ऋत’ म्हणजे असे की, श्रोत्याचे दुःखसंबंधरहित हित करणारी अशी जी सत्यवाणी तिलाच खरोखर ‘ऋत’ असे म्हणावे. भिंतीवर काढलेले चित्र पाहिले तर त्यात अनेक गोष्टी असू शकतात पण त्यामागे असणारी भिंत, ती सदासर्वदा तीच असते, त्याप्रमाणे जग हे भिन्न भिन्न म्हणजे विषम दिसत असताही ज्ञात्यांना निजबोधामुळे सर्वत्र समब्रह्मच दिसत असते. ह्याचेच नाव ‘सत्य’ हे लक्षात ठेव.

आता उद्धवाने जे प्रश्न केले, त्यात शौचाबद्दल प्रश्न केलेला नसूनही भगवान् त्या शौचाचे निरूपण आपण होऊन सांगत आहेत. अंतःकरणाची शुद्धी न होईल तर त्याग किंवा संन्यास घडत नाही. याकरिता अंतःकरणशुद्धीसाठी पूर्ण शौच म्हणजे अत्यंत निर्मळ स्वरूपाचे स्वधर्माचरण, तेच श्रीकृष्ण सांगतात.

अंतःकरणामध्ये कर्ममळाचे बंधन असते, त्याचे स्वधर्माने क्षालन करून टाकले पाहिजे. कर्मानेच कर्माचे निर्दालन करून आपण निष्कर्म
व्हावे.

क्रमशः

Related Stories

कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी!

Patil_p

मायनस जीडीपी

Patil_p

फडणवीसांना प्रशस्ती, गडकरींना विश्रांती!

Patil_p

बंगालचे रणांगण

Patil_p

कर्नाटकाची वाटचाल संपूर्ण शिथिलतेच्या दिशेने

Patil_p

टेकडय़ावरील वस्त्यांमधील दहशत, भीती

Patil_p