नवी दिल्ली:
‘देशासाठी दान’ नावाने काँग्रेसकडून राबविण्यात येणाऱ्या क्राउडफंडिंग अभियानावर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी निशाणा साधला आहे. या ऑनलाइन देणगी जमविण्याच्या अभियानाला त्यांनी ‘घराणेशाहीसाठी दान योजना’ असे संबोधिले आहे. ही योजना विशिष्ट घराण्याचे खर्च पूर्ण करण्यासाठी राबविली जाणार असल्याची टीका रिजिजू यांनी केली आहे. प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमध्ये काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या जप्त झालेल्या मोठ्या बेहिशेबी रकमेवरही त्यांनी टिप्पणी केली आहे. आता पैसे जप्त झाल्यावर काँग्रेसला क्राउडफंडिंगची योजना आणावी लागली आहे. स्वत:चा खासदार बेहिशेबी रकमेसोबत पकडला गेल्यावर काँग्रेस एका घराण्यासाठीचा खर्च उचलण्यासाठी नवी लूट योजना ‘डोनेट फॉर डायनेस्टी’ घेऊन आला असल्याचे रिजिजू यांनी म्हटले आहे. काँग्रेसने शनिवारी स्वत:ची ऑनलाइन क्राउडफंडिंग मोहीम ‘डोनेट फॉर नेशन’ सुरू केली होती. पक्षाला आर्थिकदृष्ट्या सशक्त करणे हा याचा उद्देश आहे. ही मोहीम 28 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.