Tarun Bharat

चेन्नईचा पाचवा पराभव, गुजरात विजयी

Advertisements

डेव्हिड मिलरचे नाबाद अर्धशतक, रशिद खानचे उपयुक्त योगदान,  गायकवाडचे अर्धशतक-ब्रेव्होचे 3 बळी वाया

सुकृत मोकाशी/ पुणे

सामानावीर डेव्हिड मिलरची नाबाद अर्धशतकी खेळी आणि कर्णधार रशिद खानसमवेत त्याने केलेल्या 70 धावांच्या उपयुक्त भागीदारीच्या बळावर गुजरात टायटन्सने येथे झालेल्या आयपीएलमधील साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा 3 गडय़ांनी पराभव करीत सहा सामन्यातील पाचवा विजय नोंदवला आणि गुणतक्त्यातील अग्रस्थानही भक्कम केले.

प्रथम फलंदाजी मिळाल्यावर चेन्नई सुपरकिंग्सने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 169 धावा जमविल्या. त्यानंतर गुजरातची स्थितीही 13 व्या षटकात 5 बाद 87 अशी झाली होती. वृद्धिमान साहा, गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, राहुल तेवातिया लवकर बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर व हंगामी कर्णधार रशिद खान यांनी सहाव्या गडय़ासाठी 70 धावांची उपयुक्त व निर्णायक भागीदारी करीत संघाला विजयासमीप आणले. रशिदने 21 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारांसह 40 धावा फटकावल्या तर डेव्हिड मिलरने 51 चेंडूत 8 चौकार, 6 षटकारांची बरसात करीत नाबाद 94 धावा झोडपल्या. 13 धावांची गरज असताना शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार ठोकत त्याने गुजरातचा विजय साकार केला. चेन्नईच्या ड्वेन ब्रेव्होने भेदक मारा करीत 23 धावांत 3 बळी मिळविले तर महीश तीक्षणाने 24 धावांत 2 व जडेजा, चौधरी यांनी एकेक बळी मिळविला.

गायकवाडचे पहिले अर्धशतक

चेन्नईला प्रथम फलंदाजी देत गुजरातच्या गोलंदाजांनी शेवटच्या सहा षटकांत अप्रतिम मारा करीत केवळ 45 धावा दिल्या. खराब सुरुवातीनंतर सूर गवसलेला गायकवाड व अंबाती रायुडू यांनी तिसऱया गडय़ासाठी 92 धावांची भागीदारी करीत चेन्नईचा डाव सावरला होता. सहाव्या षटकात 2 बाद 32 अशा स्थितीनंतर गायकवाडने या मोसमातील पहिले अर्धशतक नोंदवताना रायुडूसमवेत केवळ 56 चेंडूत 92 धावा फटकावल्या. गायकवाडने 48 चेंडूंच्या खेळीत 5 चौकार, 5 षटकारांची आतषबाजी करीत 73 धावा काढल्या. रायुडूने 31 चेंडूत 46 धावा फटकावताना 4 चौकार, 2 षटकार मारले. या भागीदारीवेळी त्याने गायकवाडला जास्त स्ट्राईक देण्याचे धोरण ठेवले होते.

गेल्या पाच सामन्यात अपयशी ठरलेल्या गायकवाडने सावध सुरुवात केल्यानंतर चौथ्या षटकापासून धावांचा वेग वाढवला. पुण्याचाच रहिवासी असलेल्या गायकवाडने यश दयालला फ्लिक करीत डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने पहिला षटकार नोंदवला. त्यानंतर एक चौकारही त्याने मिळविला. शमीला चौकार ठोकल्यानंतर त्याने अल्झारी जोसेफला मिडविकेटच्या दिशेने षटकार मारला. जोसेफने टाकलेल्या 11 व्या षटकात एक षटकारासह एकूण 15 धावा वसूल केल्या. एकेरी धाव घेत गायकवाडने या आयपीएलमधील पहिले अर्धशतक नोंदवले. रायुडूची साथीत त्याने दयालने टाकलेल्या 12 व्या षटकात 2 चौकार व एक षटकार मारत एकूण 19 धावा फटकावल्या. नंतर त्याने फर्ग्युसनलाही पुलचा षटकार व कव्हर ड्राईव्हचा शानदार चौका लगावला.

चेन्नई संघ 180-185 धावांची मजल मारणार असे वाटत असतानाच रायुडू व गायकवाड 7 धावांच्या फरकाने झटपट बाद झाल्यानंतर त्यांची स्थिती 4 बाद 131 अशी झाली. गायकवाड 17 व्या षटकात बाद झाल्यानंतर कर्णधार जडेजाने 12 चेंडूत नाबाद 22 व शिवम दुबेने 19 धावा फटकावत संघाला दीडशेच्या पुढे मजल मारून दिली. फर्ग्युसनने टाकलेल्या शेवटच्या षटकात या दोघांनी 18 धावा फटकावल्या. दुबे शेवटच्या चेंडूवर धावचीत झाला. गुजरातच्या अल्झारी जोसेफने 34 धावांत 2, यश दयाल व शमी यांनी एकेक बळी मिळविला. शमीने किफायतशीर मारा करीत 20 धावा दिल्या तर दयालला एका बळीसाठी 40 धावा मोजाव्या लागल्या. महागडा ठरलेल्या फर्ग्युसनने 4 षटकांत 46 तर हंगामी कर्णधार रशिद खानने 29 धावा दिल्या.

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पंडय़ा जखमी असल्याने या सामन्यासाठी तो उपलब्ध नव्हता. त्यामुळे नाणेफेकीला बदली कर्णधार म्हणून रशीद खान आला होता.

संक्षिप्त धावफलक ः चेन्नई सुपरकिंग्स 20 षटकांत 5 बाद 169 ः गायकवाड 73 (48 चेंडूत 5 चौकार, 5 षटकार), उथप्पा 3 (10 चेंडू), मोईन अली, रायुडू 46 (31 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), दुबे 19 (17 चेंडूत 2 चौकार), जडेजा नाबाद 22 (12 चेंडूत 2 षटकार), अवांतर 5. गोलंदाजी ः जोसेफ 2-34, शमी 1-20, दयाल 1-40, फर्ग्युसन 0-46, रशिद खान 0-29.

गुजरात टायटन्स 19.5 षटकांत 7 बाद 170 ः साहा 11, गिल 0, विजय शंकर 0, मनोहर 12, मिलर नाबाद 94 (51 चेंडूत 8 चौकार, 6 षटकार), तेवातिया 6, रशिद खान 40 (21 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), अवांतर 7. गोलंदाजी ः ब्रेव्हो 3-23, तीक्षणा 2-24, चौधरी 1-18, जडेजा 1-25.

Related Stories

दक्षिण आफ्रिकेचा विंडीज दौरा बेमुदत कालावधीसाठी स्थगित

Patil_p

मिथुन मंजुनाथला उपविजेतेपद

Patil_p

ऑलिंपिक चॅम्पियन सॅनेयेव्ह कालवश

Patil_p

न्यूझीलंड अ संघाच्या डावात फिलीप्सचे अर्धशतक

Patil_p

लंकेचा क्रिकेटपटू झोयसा दोषी

Patil_p

किर्गीओस, कॅस्पर रुड विजयी

Patil_p
error: Content is protected !!