दुबे-उथप्पाची 165 धावांची भागीदारी, तीक्षणाचे 4, जडेजाचे 3 बळी, कार्तिक-प्रभुदेसाई-शाहबाजचे प्रयत्न अपुरे
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
सामनावीर शिवम दुबे व रॉबिन उथप्पा यांनी अर्धशतकांसह नोंदवलेली धडाकेबाज दीडशतकी भागीदारी आणि महीश तीक्षणा, रविंद्र जडेजा यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएलमधील पहिला विजय नोंदवताना आरसीबीवर 23 धावांनी मात केली. आरसीबीचा हा पाच सामन्यातील दुसरा पराभव आहे.
चेन्नईने प्रथम खेळताना निर्धारित 20 षटकांत 4 बाद 216 धावा फटकावल्या. त्यानंतर आरसीबीला 20 षटकांत 9 बाद 193 धावांवर रोखत 23 धावांनी विजय साकार केला. आरसीबीतर्फे शाहबाज अहमद (27 चेंडूत 41), प्रथमच खेळण्याची संधी मिळालेला गोव्याचा सुयश प्रभुदेसाई (18 चेंडूत 34) व दिनेश कार्तिक (14 चेंडूत 34) यांनी फटकेबाजी करीत आव्हानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न शेवटी अपुरे पडले. महीश तीक्षणा चेन्नईचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 33 धावांत 4 तर कर्णधार जडेजाने 39 धावांत 3 बळी मिळविले.
उथप्पा-दुबे यांची दीडशतकी भागीदारी
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर उथप्पा (50 चेंडूत 88) व शिवम दुबे (46 चेंडूत नाबाद 95) यांनी 2 बाद 36 अशी खराब सुरुवात झाल्यानंतर तिसऱया गडय़ासाठी 74 चेंडूत 165 धावांची भागीदारी करीत चेन्नईला दोनशेचा टप्पा गाठून दिला. या मोसमात नोंदवलेली ही सर्वोच्च धावसंख्या असून आयपीएलमधील चेन्नईचा हा 200 वा सामना आहे. उथप्पा व दुबे यांनी आपल्यातील षटकार खेचण्याची क्षमता दाखवून देताना दोघांनी मिळून 17 षटकार ठोकत आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली. उथप्पाच्या खेळीत 9 षटकार व 4 चौकारांचा तर दुबेच्या खेळीत 8 षटकार व 5 चौकारांचा समावेश होता. दोघांनीही आयपीएलमधील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.
सलामीवीर उथप्पाने प्रारंभी स्थिरावण्यास थोडा वेळ घेतला. त्याने पाचव्या षटकात सिराजला कटचा पहिला चौकार नोंदवला. त्यानंतर पुढच्या षटकात आकाशदीपला त्याने पहिला षटकार खेचला. दुबेची साथ मिळाल्यानंतर दोघांनी धावांचा वेग वाढविला. दुबेने मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर आपला पहिला षटकार मारला. 11 व्या षटकापासून फटकेबाजीला सुरुवात झाली आणि 15 व्या षटकापर्यंत 2 बाद 133 अशी त्यांनी मजल मारून दिली. त्यांनी प्रत्येक गोलंदाजांवर हल्ला चढविला. उथप्पाने मॅक्सवेलच्या 13 व्या षटकात तीन षटकार ठोकत या षटकात 19 धावा वसूल केल्या. आकाशदीपने टाकलेल्या 15 व्या षटकात त्यांनी चौकार, षटकारांची आतषबाजीच केली. अर्धशतक पूर्ण झाल्यावर उथप्पाने आक्रमण आणखी तेज केले. त्याने सिराजला 17 व्या षटकात 2 षटकार, एक चौकार मारत एकूण 18 धावा काढल्या. 18 व्या षटकात दुबेने आकाशदीपवर हल्ला करीत 2 षटकार, 1 चौकार मारला. या षटकात एकूण 24 धावा फटकावल्या गेल्या. 19 व्या षटकात उथप्पा 88 धावांवर बाद झाला. शेवटच्या षटकात दुबेने 2 षटकार नोंदवत संघाला सव्वादोनशेच्या जवळपास मजल मारून दिली. मात्र दुबेला पहिले आयपीएल शतक नोंदवता आले नाही. त्याआधी सुरुवातील ऋतुराज गायकवाड (17) पुन्हा एकदा अपयशी ठरला तर मोईन अलीही (3) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर उथप्पा व दुबे यांनीच आरसीबीवर हुकूमत गाजविली.
संक्षिप्त धावफलक ः चेन्नई सुपरकिंग्स 20 षटकांत 4 बाद 216 ः गायकवाड 17 (16 चेंडूत 3 चौकार), उथप्पा 88 (50 चेंडूत 4 चौकार, 9 षटकार), मोईन अली 3 (8 चेंडू), शिवम दुबे नाबाद 95 (46 चेंडूत 5 चौकार, 8 षटकार), जडेजा 0, धोनी नाबाद 0, अवांतर 13. गोलंदाजी ः वणिंदू हसरंगा 2-35, हॅझलवूड 1-33, सिराज 0-37, आकाशदीप 0-58, मॅक्सवेल 0-29 (3 षटके), शाहबाज अहमद 0-18 (2 षटके).
आरसीबी 20 षटकांत 9 बाद 193 ः अनुज रावत 12, डय़ू प्लेसिस 8, कोहली 1, मॅक्सवेल 11 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 26, शाहबाज अहमद 27 चेंडूत 4 चौकारांसह 41, सुयश प्रभुदेसाई 18 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 34, सिराज नाबाद 14, हसरंगा 7, हॅझलवूड नाबाद 7, अवांतर 9. गोलंदाजी ः तीक्षणा 4-33, जडेजा 3-39, मुकेश चौधरी 1-40, ड्वेन ब्रेव्हो 1-42.