लो स्कोअरिंग आयपीएल साखळी सामन्यात मुंबईचा 5 गडी राखून विजय, चेन्नईसाठी 12 सामन्यातील आठवा पराभव, 3 बळी घेणारा सॅम्स ‘गेम चेंजर’
मुंबई / वृत्तसंस्था
यंदाच्या प्ले-ऑफ शर्यतीतून यापूर्वीच बाहेर फेकल्या गेलेल्या मुंबई इंडियन्सने गुरुवारी चेन्नई सुपरकिंग्सचे स्पर्धेतील आव्हानही सकृतदर्शनी संपुष्टात आणले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लो स्कोअरिंग लढतीत डॅनिएल सॅम्सच्या (3-16) भेदक माऱयामुळे चेन्नईचा डाव अवघ्या 97 धावांमध्ये संपुष्टात आला तर मुंबई इंडियन्सला 14.5 षटकात विजय संपादन करण्यासाठी 5 गडी मोजावे लागले.
विजयासाठी 98 धावांचे किरकोळ आव्हान असताना मुंबईने देखील एकवेळ 5 षटकात 33 धावांमध्येच 4 फलंदाज गमावले होते. नंतर केवळ तिलक वर्मा (32 चेंडूत नाबाद 34) व ऋतिक शोकिन (18) यांनी पाचव्या गडय़ासाठी 48 धावांची भागीदारी साकारत संघाला विजयाच्या ट्रकवर आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. मुंबईने 14.5 षटकात 5 बाद 103 धावांसह विजय संपादन केला. चेन्नईचा हा 12 सामन्यातील आठवा पराभव असून सध्या ते 8 गुणांसह नवव्या स्थानी फेकले गेले आहेत. आयपीएल प्ले-ऑफ शर्यतीतून यापूर्वीच बाहेर फेकला गेलेला मुंबईचा संघ 12 सामन्यात 9 पराभवांसह शेवटच्या, 10 व्या स्थानी आहे.
डॅनिएल सॅम्सचे 3 बळी
प्रारंभी, जलद गोलंदाज डॅनिएल सॅम्सने 3 षटकांच्या पहिल्या स्पेलमध्येच 3 बळी मिळवल्यानंतर मुंबईने चेन्नई सुपरकिंग्सचा डाव 97 धावांमध्ये संपुष्टात आणला. सॅम्सने 3 बळी घेतल्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघ यातून अखेरपर्यंत सावरला नाही. रिले मेरेडिथ व कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले तर जसप्रित बुमराह व रमणदीप सिंग यांनीही प्रत्येकी 1 गडी बाद केला.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकाकी लढत देत 33 चेंडूत नाबाद 36 धावांचे योगदान दिले. त्याच्या या खेळीत 4 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला. डेव्हॉन ब्रेव्होने (12) धोनीसमवेत सातव्या गडय़ासाठी 39 धावांची भागीदारी केली आणि हीच चेन्नईच्या डावातील सर्वोच्च भागीदारी ठरली. मुंबईच्या गोलंदाजांनी 15 अवांतर धावा दिले नसते तर चेन्नईवर आणखी नामुष्की येणे भाग होते.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर कॉनव्हेला वादग्रस्तरित्या पायचीत दिले गेल्यानंतर दोनच चेंडूंच्या अंतराने मोईन अलीने शॉर्ट मिडविकेटवर शोकिनकडे सोपा झेल दिला. त्यानंतर बुमराहने रॉबिन उत्थप्पाला (1) पायचीत केले आणि उत्थप्पाही तांत्रिक कारणामुळे डीआरएस घेऊ शकला नाही. पुढे सॅम्सने ऋतुराजला (7) इशानकरवी झेलबाद करत आणखी एक धक्का दिला. चेन्नईची पॉवर प्लेच्या 6 षटकाअखेर 5 बाद 32 अशी मोठी पडझड झाली.
शिवम दुबे डावातील सातव्या षटकात बाद झाल्यानंतर धोनी व डेव्हॉन ब्रेव्हो यांनी संघाला 12 व्या षटकाअखेर 6 बाद 72 धावांपर्यंत नेले. मात्र, ब्रेव्हो, सिमरजीत सिंग व महिश तिक्षणा अवघ्या 8 चेंडूंच्या अंतरात बाद झाले आणि चेन्नईची 15 षटकात 9 बाद 87 अशी दशा झाली. 16 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बीट झाल्यानंतर धोनीने एकेरी धाव घेण्याचा धोका पत्करला. पण, इशान किशनच्या थेट थ्रोमुळे मुकेश चौधरी धावचीत झाला आणि येथेही फासे चेन्नईच्या उलटेच पडले.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपरकिंग्स : 16 षटकात सर्वबाद 97 (महेंद्रसिंग धोनी 33 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 36, डेव्हॉन ब्रेव्हो 15 चेंडूत 12, शिवम दुबे 9 चेंडूत 10. अवांतर 15. डॅनिएल सॅम्स 4 षटकात 3-16, रिले मेरेडिथ 3 षटकात 2-27, कुमार कार्तिकेय 3-0-22-2, बुमराह, रमणदीप सिंग प्रत्येकी 1 बळी).
मुंबई इंडियन्स : 14.5 षटकात 5 बाद 103 (तिलक वर्मा 32 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 34, रोहित शर्मा 18, शोकिन 18, टीम डेव्हिड 7 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 16. अवांतर 10. मुकेश चौधरी 4 षटकात 3-23, सिमरजीत, मोईन अली प्रत्येकी 1 बळी).
फ्लडलाईट टॉवरमध्ये बिघाड आणि चेन्नई डीआरएसपासून वंचित!
चेन्नईचा संघ फलंदाजी करत असताना वानखेडे स्टेडियमवरील एका फ्लडलाईट टॉवरचा वीजपुरवठा खंडित झाला आणि यामुळे चेन्नईला डावाच्या प्रारंभी डीआरएस घेण्याची मुभा नव्हती. यादरम्यानच 3 पैकी 2 फलंदाज पायचीत झाले आणि यावर चेन्नईला इच्छा असली तरी डीआरएस घेणे शक्य नव्हते.
डीआरएस नसल्याने कॉनव्हेला फटका
डीआरएस उपलब्ध नसल्याचा कॉनव्हेला प्रामुख्याने फटका बसला. यापूर्वी चेन्नईविरुद्ध 87 धावांची सामना जिंकून देणारी खेळी साकारणाऱया कॉनव्हेला दुसऱया चेंडूवर पायचीत देण्यात आले. मात्र, सदर चेंडू डाऊन द लेगकडे जाणारा असल्याने हा निर्णय संशयास्पद होता. डीआरएस नसल्याने कॉनव्हेला क्रीझ सोडून जाणे भाग होते.
मुंबई इंडियन्स व चेन्नई प्ले-ऑफमध्ये नसण्याची पहिलीच वेळ!
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सनंतर चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान देखील संपुष्टात आले असून यामुळे मुंबई व चेन्नई यापैकी एकही संघ प्ले-ऑफमध्ये नसण्याची आयपीएल इतिहासातील ही पहिलीच वेळ असणार आहे.