Devendra Fadnavis on Ajit Pawar : छत्रपती संभाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं धर्माचं रक्षण केलं. राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म तिन्हीचं रक्षण केलं. मुळात त्यांना कोणत्या कारणावरून मारण्यात आलं हे लक्षात घेतलं पाहिजे. हिंदू धर्माचा त्याग करा, असं औरंगजेब त्यांना सांगत होता. पण, त्यांनी ते मान्य केलं नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्मासाठी हालअपेष्टा भोगून त्यांनी बलिदान दिलं. त्यांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे करण्यात आले. तरीही त्यांनी स्वराष्ट्र, स्वधर्म आणि स्वराज्याची भाषा सोडली नाही. अजित पवार व त्यांच्या विचारांच्या लोकांनी काही वेगळ दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
छत्रपती संभाजी महाराज हे धर्म रक्षक नव्हे तर स्वराज्य रक्षक होते. काही लोक जाणीवपूर्वक त्यांचा उल्लेख ‘धर्मवीर’ असा करतात, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केलं होतं. याला उत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक तर होतेच, पण ते धर्मवीरही होते,’ असं फडणवीस ठामपणे म्हणाले.
काय म्हणाले होते अजित पवार?
संभाजीराजे हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक होते. त्यांनी कधीच कुठेही धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यावरून काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर असे म्हणतात. मी सरकारमध्ये असताना स्वत: अनेकांना ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ असा उल्लेख करावा, असंच सांगायचो, असं त्यांनी म्हटलं होतं.


next post