विभागीय क्रीडा संकुल नामकरण प्रकरण : संभाजीनगरातील मंडळांचा तिसऱयांदा पवित्रा : क्रीडा संकुल समितीला आवाहन : 14 मे पर्यंतचा अल्टिमेटम
संग्राम काटकर/कोल्हापूर
विभागीय क्रीडा संकुलाचे केलेले छत्रपती संभाजी महाराज नामकरण कायम ठेवण्यात यावे, येत्या 14 मे पर्यंत अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीपर्यंत यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात यावी, अशी मागणी संभाजीनगरातील मंडळांनी केली आहे. या संदर्भात निर्णय झाला नाही तर आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही या मंडळांनी विभागीय क्रीडा संकुल समितीला दिला आहे. त्यामुळे कोरोनामुळे तीन वर्षे प्रलंबित असलेला नामकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
तीन वर्षापूर्वी संभाजीनगरातील मंडळांनी गनिमी काव्याने विभागीय क्रीडा संकुलाचे श्री छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल असे नामकरण केले होते. पण राज्य शासनाने याकडे फारसे गांभिर्याने पाहिले नाही. त्यामुळे 17 जानेवारी 2021 ला दुसऱयांदा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारावर नामफलक लावून संभाजी महाराजाचेच नाव कायमस्वरुपी ठेवा, असे आवाहन विभागीय क्रीडा संकुल समितीला केले. त्यासाठी 14 मे रोजी 2021 रोजीच्या महाराज जयंतीपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे अल्टिमेटम मागे घेतला होता. पण आता कोरोनाची लाट ओसरल्यानंतर या मंडळांनी नामकरणाच्या मुद्दय़ावर तिसऱ्यांदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. 14 मे रोजीच्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीपर्यंत नामकरण अधिकृत करावे, एवढीच मंडळांची अपेक्षा आहे.
2019 सालच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या आदल्या रात्री 12 वाजता संभाजीनगरातील मंडळांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नामकरण प्रमुख व मराठा रियासतचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांच्यासह श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाचे अध्यक्ष अजित सासने, राकेश भोसले, उमेश पोवार, राजू चरापले, सुजित जाधव यांच्यासह 300 कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत विभागीय क्रीडा संकुलाचे छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकूल असे नामकरण केले. तसा फलकही प्रवेशद्वारावर लावून आनंदोत्सव साजरा केला. दुसऱया दिवशी ही माहिती मिळताच संभाजीनगरातील मंडळांच्या भूमिकेला शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा लाभला.
दुसऱ्यांदा नामकरणाची लावली पाटी…
दरम्यान, 2019 मध्ये मंडळांनी केलेले नामकरण योग्य की अयोग्य यावर विभागीय क्रीडा संकुल समिती पातळीवर निर्णय झाला नाही. अशातच मार्च 2020 साली कोरोनाची साथ आल्याने निर्णय प्रलंबित राहिला. त्यानंतर मंडळांनी संभाजी महाराजांचा नावाचा ऍक्रॅलिक मटेरिअलमध्ये नामफलक बनवून तो 17 जानेवारी 2021 रोजीच्या महाराजांच्या राज्याभिषेकदिनी क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारावर लावला खरा. मात्र तेव्हापासून ही आजतागायत नाव अधिकृत करण्याबाबत काहीच पाऊले उचलली गेली नाहीत. त्यामुळे आता नामकरणाकडे तिसऱयांदा लक्ष वेधण्यासाठी संभाजीनगरातील मंडळे पुन्हा एकवटली आहेत.
गप्प बसणार नाही…मंडळांचा इशारा
गतकाळात कोरोनाचा धोका असल्याने आम्ही शांत बसलो. तेव्हा लोकभावनेनुसार संभाजी महाराजांचे दिलेले नाव कायम करण्यास संकुल समितीला अडचण नाही. मात्र 14 मे पर्यंत नाव कायमस्वरुपी न केल्यास कार्यकर्ते शांत बसणार नाहीत, असा इशाराही मंडळांच्या पदाधिकाऱयांनी दिला आहे.
मंडळांची बैठक बोलावणार…
विभागीय क्रीडा संकुलाला छत्रपती संभाजी महाराजाचेच नाव अधिकृत करावे यासाठी शहरातील सर्व मंडळांची बैठक बोलावणार आहे. यातील निर्णय विभागीय क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष पालकमंत्री सतेज पाटील यांना कळवून नामकरण अधिकृत करण्याबाबत विनंती केली जाईल.
फत्तेसिंह सावंत (नामकरण प्रमुख)