Tarun Bharat

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला

संभाजीराजे छत्रपती यांचा घणाघात : राज्यसभेच्या निवडणुकीत माघार घेतल्याचे केले स्पष्ट : स्वराज्यच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार

प्रतिनिधी/कोल्हापूर

राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याचे ठरविल्यानंतर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यांनी पाठिंबा देण्याचा शब्दही दिला होता. पण नंतर त्यांनी तो शब्द पाळला नाही. त्यांनी शब्द मोडला, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

राज्यसभेची निवडणूक न लढविण्याचा निर्णय मी घेतला आहे. हा निर्णय म्हणजे माघार नव्हे, तर हा स्वाभिमान आहे. खासदारकीपेक्षा मला जनता जवळची आहे. त्यांच्यासाठी ‘स्वराज्य‘च्या माध्यमातून काम करणार असून आता महाराष्ट्र पिंजून काढणार आहे, अशी घोषणाही यावेळी संभाजीराजे यांनी केली.
शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी गुरुवारी राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केल्यानंतर छत्रपती संभाजी राजे कोणती भूमिका घेतात याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागते होते. त्यांची भूमिका ते पत्रकार परिषदेत मांडणार असेच त्यांनी गुरुवारी जाहीर केले होते. त्याप्रमाणे छत्रपती संभाजी राजे यांनी शुक्रवारी (27 मे) मुंबईत पत्रकार परिषदेत घेत आपल्या भावना मांडल्या.

संभाजीराजे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. मात्र त्यांनी तो नंतर पाळला नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शिवसेनेने पक्षाकडून निवडणूक लढवण्याची अट घातल्यामुळे पेच निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे आपल्याला फार दुःख झाले. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द मोडला. आता स्वराज्य बांधण्यासाठी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मोकळा झालो आहे. लोकांची इच्छा होती की सगळ्यांना संघटित करा. त्यासाठी आज मिळालेली ही संधी आहे. माझी स्पर्धा माझ्याबरोबर आहे. म्हणून या विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरीबांना न्याय देण्यासाठी मी स्वराज्यच्या माध्यमातून उभा राहणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

शिवसेनेबरोबर दोन प्रस्तावांवर चर्चा
पहिल्या प्रस्तावात मी शिवबंधन बांधून उमेदवारी घ्यावी, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. पण मी स्पष्टपणे सांगितले की मी शिवसेनेत प्रवेश करू शकत नाही. त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी फोन करून निमंत्रित केलं. त्यानुसार त्यांना भेटायला वर्षावर गेलो. या बैठकीत तीन मुद्यावर चर्चा करण्यात आली. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, मी ही निवडणूक अपक्ष लढवणार आहे. सर्व पक्षांनी मला मदत करावी. पण शिवबंधन बांधण्याच्या अटीवर त्याचक्षणी मी नाही म्हणून सांगितलं. मी त्यांना माझा प्रस्ताव सांगितला.

शिवसेनेची ही जागा असल्याचे ते सांगतात. मात्र त्यांचा हा कोटा नाही. शिवसेनेच्या माध्यमातून महाविकासआघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून मला उमेदवारी द्यावी अशी मागणी मी केली होती. पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून उमेदवारी देऊ शकतो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होते. मात्र त्यावर विचार करण्यासाठी मी त्यांना दोन दिवस दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पर्यायांचा ड्राफ्ट तयार झाला. त्यानुसार प्लॅनही तयार झाला. तो ड्राफ्ट आजही माझ्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ भेटण्यास आले होते. पण नंतर सेनेने आपला उमेदवार जाहीर केला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही, त्याचे दुःख आहे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.

घोडेबाजार होऊन नये यासाठी न लढण्याचा निर्णय
सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी अशी अपेक्षा होती. पण ते होताना दिसत नाही. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी ही निवडणूक लढणार नाही. पण ही माघार नाही. हा माझा स्वाभिमान आहे. मात्र माझ्या कुठल्याही पक्षाशी रोष नाही. माझ्या पाठिंब्याच्या फॉर्मवर सहय़ा करणाऱयांना आमदारांच्या आयुष्यभर पाठिशी राहणार. असेही संभाजीराजे म्हणाले.

आता मी मोकळा, जनता माझी ताकद
आता मोकळा आहे. 2009 प्रमाणेच पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज आहे. माझी ताकद 42 आमदार नाही. तर माझी ताकद राज्यातील जनता आहे. म्हणून मी जनतेला भेटायला जाणार आहे, असेही संभाजीराजेंनी स्पष्ट केले.

संभाजीराजे खोटे बोलले का हे उद्धव ठाकरे यांनी सांगावे
मी खूप काही बोलणार आहे, पण बोलायची इच्छा नाही. जे बोलायचं आहे तो माझा स्वभाव नाही. पण मला ते बोलणं गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासोबत राज्यातील कोणत्याही शिवस्मारकाजवळ जाऊन संभाजीराजे खोटे बोलले का हे सांगावे, असे आव्हानच संभाजीराजे यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांसह खासदार, मंत्र्यांचे मौन
संजय पवार माझे लाडके कार्यकर्ते आहेत. त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करून काय चालले आहे? असे विचारले असता ते माझ्याशी काहीही बोलू शकले नाहीत, असे संभाजीराजेंनी सांगितले.

Related Stories

जम्मू : दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, 3 ठार, एकाची शरणागती

Tousif Mujawar

बगदादमध्ये फुटबॉल स्टेडियमजवळ बॉम्बस्फोट, १० जणांचा मृत्यू

Archana Banage

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची गरज, मुख्यमंत्री घोषणा करणार- राजेश टोपे

Archana Banage

देशाचे संरक्षण केलेल्या सैनिकांबद्दल समाजात प्रचंड आदर – आमदार आबीटकर

Abhijeet Khandekar

एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये: मुख्यमंत्री ठाकरे यांचे निर्देश

Archana Banage

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar