नयनरम्य आतषबाजी आणि डॉल्बीचा दणदणाट, शिवतीर्थावर भगवे वातावरण
प्रतिनिधी/मिरज
शहरातील मंगळवार पेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळय़ाच्या सुवर्णमहोत्सवनिमित्त पुतळा सुशोभिकरण कामाचे लोकार्पण मंगळवारी रात्री साडेआठ वाजता हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत झाले. भगव्या पताका, झेंडे, भगवे फेटाधारी युवक-युवती यामुळे शिवतीर्थावर भगवे वातावरण अवतरले होते. नयनरम्य आतषबाजी आणि डॉल्बीच्या दणदणाटात सुमारे चार तास हा कार्यक्रम रंगला होता. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी, आयुक्त नीतीन कापडणीस, सुरेश आवटी, मकरंद देशपांडे, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, दीपक शिंदे (म्हैसाळकर), बजरंग शिंदे, संदीप आवटी यांच्या हस्ते सुशोभिकरण कामाचे उद्घाटन झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाच्या स्थापनेस यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने महापालिकेच्या वतीने सुमारे 37 लाख रुपये खर्चून पुतळ्याच्या सभोवतालचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण मंगळवारी सायंकाळी भव्य सोहळय़ात करण्यात आले. शिवतीर्थ समिती आणि सुरेशबापू आवटी युवा मंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी चार वाजल्यापासून शिवतीर्थाच्या चारही बाजूचे रस्ते शिवभक्तांनी फुलून गेले होते. सुमारे दहा हजार तरूण-तरूणी भगवे फेटे, टोफ्या घालून जमले होते. शिवछत्रपतींचा जयघोष आणि डॉल्बीवरील पोवाडय़ांनी परिसर दुमदुमून गेला होता. नयनरम्य रोषणाईने अवघे शिवतीर्थ झळाळून निघाले होते. अवकाशात रंगीबेरंगी आतषबाजी होती. सर्वत्र शिवमय वातावरण होते.