सोशल मीडियावरुन चुकीची माहिती व्हायरल; नागरिकांनी दूर्लक्ष करण्याची गरज; चिकन, मटण बिनधास्त खावा; पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
कोल्हापूर प्रतिनिधी
कोंबडय़ांना लंम्पीस्कीनची लागण झाल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही अफवा असून सोशल मीडियावरुन चुकीची माहिती समाजामध्ये पसरवली जात आहे. लंम्पीस्कीनचा संसर्ग केवळ गाय आणि म्हैस वर्गातच होत असल्याने नागरिकांनी चिकन, मटण, अंडी बिनधास्त खावावीत असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. तसेच अशा पद्धतीची चुकीची माहिती व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.
देशात सध्या लंम्पीस्कीन आजाराचा फैलाव वाढत आहे. विशेषतः या आजाराचा संसर्ग केवळ गाय, म्हैस आणि बैल आदी जनावरांनाच होत आहे. मात्र सोशल मीडियावरुन काही विकृतांकडून बॉयलर कोंबडय़ांना लंम्पीस्कीनची लागण झाल्याचे फोटो व्हायरल केले जात आहेत. नागरिकांमध्ये चुकीची माहिती पाठवल्यामुळे त्यानी चिकन खरेदीकडे पाठ फिरवल्यास पुन्हा एकदा पोल्ट्री व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता आहे.
पोल्ट्री व्यवसायिक धास्तावले
कोरोना संसर्ग काळातही कोंबडय़ांमधून कोरोनाच्या विषाणूची निर्मिती झाली अशी चुकीची माहिती सोशल मीडियावरुन व्हायरल करण्यात आली. चिकन खाल्ल्यानेही कोरोनाचा संसर्ग होते अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांनी चिकनकडे पाठ फिरवली. यामुळे चिकनचे दर गडगडले, कोंबडय़ांच्या मागणीत घट झाल्याने पोल्ट्री व्यवसायिकांनी केवळ 5 रुपयांना अखंड कोंबडीची विक्री केली. याकाळात पोट्री व्यवसाय पूर्णत उध्वस्त झाला. यानंतर कोंबडय़ांपासून कोरोनाची लागण होत नाही याबाबत जनजागृती केल्यानंतर पोल्ट्री व्यवसाय हळूहळू पुर्वपदावर आला. सध्या देखील लंम्पीस्कीन या संसर्गजन्य आजाराच्या काळात अशाच पद्धतीने चुकीची माहीत व्हायरल होवू लागल्याने पोल्ट्री व्यवसायिक धास्तावले आहेत.
केवळ गाय, म्हैस, बैल वर्गातच संसर्ग
लंम्पीस्कीनचा संसर्ग केवळ गाय, म्हैस, बैल वर्गातील जनावरांमध्ये संसर्ग होत आहे. यापैकीही गाय वर्गातील जनावरांमध्ये जलद संसर्ग होत असून म्हैस व बैल वर्गात संसर्गाचे प्रमाण कमी आहे. कोंबडा, कोंबडी, शेळी, कुत्रा अशा पाळीव प्राण्यांना लंम्पीस्कीनची लागण होत नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.
गाय, म्हैशीच्या दुधाबाबतही गैरसमज
चिकन बरोबरच गाय आणि म्हैशीच्या दुधाचे सेवन केल्यासही लंम्पीस्कीनची लागण होते अशीही चुकीची माहिती सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहे. मात्र लंम्पी आजाराचा मानवाच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही. दूध हे आरोग्यासाठी लाभदायक असल्याने गाय, म्हैशीच्या दुधाबाबतही पसरविण्यात येणाऱया गैरसमजाकडे नागरिकांनी लक्ष देवू नये, असे आवाहनही पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
लंम्पीस्कीनचा इतर पशुपक्षांना धोका नाही
लंम्पीस्कीन संसर्गाबाबत सध्या सोशल मीडियावरुन चुकीची माहिती पसरवली जात आहे. मात्र लंम्पीवर केलेल्या संशोधनामध्ये या आजार केवळ गाय व म्हैस वर्गातील जनावरांनाच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी चिकन आणि दूधाच्या सेवनातून लंम्पीचा संसर्ग होतो ही भिती बाळगू नये. चिकन, मटण, दूध, अंडी आदींचे नियमित सेवन करावे.