आशिया चषक स्पर्धेसाठी प्रवास लांबणीवर, तूर्तास, मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा पारस म्हाम्ब्रे यांच्याकडे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची बाधा झाली असून यामुळे ते आशिया चषकासाठी संघासमवेत दुबईला तूर्तास रवाना होऊ शकलेले नाहीत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी ही माहिती दिली. यंदाची आशिया चषक स्पर्धा दि. 27 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे.
भारतीय संघ यंदा या स्पर्धेत दि. 28 ऑगस्ट रोजी कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध लढतीने आपल्या मोहिमेला प्रारंभ करत आहे. ‘राहुल द्रविड सध्या बीसीसीआय वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहेत. कोरोनावर मात केल्यानंतर ते भारतीय पथकात दाखल होऊ शकतील’, असे शाह यांनी पत्रकातून नमूद केले.
राहुल द्रविड भारतीय प्रशिक्षण पथकात दाखल होईतोवर सहायक प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मात्र, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे ही जबाबदारी तोवर सोपवायची का, यावर चर्चा सुरु आहे.
‘व्हीव्हीएस लक्ष्मण यांना हरारेमधून दुबईला पाठवायचे का, याबद्दल अद्याप आम्ही विचार केलेला नाही. जर आवश्यकता असेल तर त्याबद्दल निर्णय घेतला जाईल. लक्ष्मणबाबत निर्णय होत नाही, तोवर पारस म्हाम्ब्रे यांच्याकडे प्रशिक्षकपदाची सूत्रे असतील. संघातील सर्व सदस्य पूर्ण फिट असून मंगळवारी सकाळी ते संयुक्त अरब अमिरातकडे रवाना झाले आहेत’, असे बीसीसीआयमधील एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.
आशिया चषकासाठी संघातील बहुतांशी खेळाडू मुंबईतून मंगळवारी सकाळी रवाना झाले आहेत. उपकर्णधार केएल राहुल, दीपक हुडा व राखीव खेळाडू अक्षर पटेल झिम्बाब्वेविरुद्धची मालिका पूर्ण झाल्यानंतर हरारे येथूनच दुबईमध्ये दाखल होतील.