अंतरिम प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण मायदेशी परतले
दुबई / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कोरोनावर मात केली असून पाकिस्तानविरुद्ध आशिया चषकातील सलामी लढतीपूर्वी ते भारतीय पथकात दाखल झाले. राहुल द्रविड यांना यापूर्वी भारतातून संयुक्त अरब अमिरातला रवाना होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले व यामुळे त्यांना हा प्रवास लांबणीवर टाकावा लागला होता.
‘भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कोव्हिड-19 अहवाल निगेटिव्ह आला आहे आणि ते दुबईत संघात दाखल झाले आहेत. अंतरिम प्रशिक्षक या नात्याने संघासमवेत दुबईत असलेले व्हीव्हीएस लक्ष्मण आता भारत अ संघाच्या सरावाचे नियोजन करण्यासाठी बेंगळूरमध्ये परतले आहेत’, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पत्रकाद्वारे दिली.
राहुल द्रविड दि. 23 ऑगस्ट रोजी घेतलेल्या चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर ते होम आयसोलेट होते. द्रविड यांच्यात सौम्य लक्षणे आढळून आल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी त्यावेळी म्हटले होते.