Tarun Bharat

कोरोना, महापूरच्या संकटात कोल्हापूरकारांना आधार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूरशी स्नेह, नाते : रंकाळ्य़ासाठी निधी, हद्दवाढीसाठी सकारात्मक

Advertisements

संजीव खाडे/कोल्हापूर

ठाकरे सरकारविरोधात पुकारलेले बंड यशस्वी करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरशी वेगळा स्नेह आणि नाते जपले आहे. 2020 मध्ये आलेली कोरोनाची साथ आणि त्यानंतर पाठोपाठ 2021 मध्ये आलेला महापूर या दोन्ही संकाटताच्या काळात शिंदे यांनी कोल्हापूरकरांना दिलासा, आधार देण्याचे कर्तव्य पार पाडले होते. त्याचबरोबर कोल्हापूरच्या विकासासाठीही त्यांनी निधी दिला. टोल रद्दच्या भूमिकेत शिंदे यांची भूमिका महत्वाची ठरली होती. हद्दवाढीच्या बाबतीतही ते सकारात्मक राहिले.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि नूतन मुख्यमंत्री शिंदे यांचे शिवसेनेच्या वर्तुळात अतूट नाते. फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिंदे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) होते. त्या काळात कोल्हापुरातील टोलचे आंदोलन पेटले होते. 2014 मध्ये राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार गेले आणि भाजप-शिवसेनेचे फडणवीस सरकार सत्तेवर आले. या काळात शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री असताना कोल्हापूरच्या टोलचा प्रश्न आक्रमकपणे मार्गी लावला. टोलच्या आंदोलनातील कोल्हापूरकारांच्या भावना, त्यातील शिवसेनेचा सहभाग, क्षीरसागर यांचा शिंदे यांच्याकडील आग्रह यामुळे शिंदे यांनी आयआरबी कंपनीच्या मालकाला आपल्या शिंदे स्टाईलमध्ये दम भरला. त्यानंतर आयआरबी कंपनीने माघार घेत, भरपाईच्या रकमेवर तडजोड केली, अशी चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात रंगली होती. पुढे 2019 मध्ये राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. त्यामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिंदे यांच्याकडे नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी सोपविली. दरम्यान, 2020 मध्ये कोरोनाची साथ आली. या संकाटात शिंदे यांनी कोल्हापूरसाठी केलेली मदत लक्षवेधी ठरली होती. मंत्री म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी मदत केली. पण आपल्या मुलाच्या नावाने असणाऱ्या खासदार श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातूनही रूग्णवाहिका कोल्हापूरसाठी दिली. कोरोनाग्रस्तांना क्षीरसागर यांच्यामाध्यमातून मदतीचे पॅकेटस्ही पाठवून दिले.

2020 च्या कोरोनाच्या संकाटानंतर 2021 मध्ये कोल्हापूरवर महापुराचे संकट आले. या काळात एकनाथ शिंदे स्वतः तीन दिवस कोल्हापूरमध्ये ठाण मांडून होते. पूरग्रस्तांना दिलासा देण्याबरोबर सरकारकडून आपत्ती व्यवस्थानाच्या पातळीवरील भरीव मदत केली. पूरग्रस्तांच्या शिबिरांना थेट भेट देवून त्यांचे अश्रू पुसले होते.

कोल्हापूर महापालिकेसाठी कोट्य़वधींचा निधी
शिंदे यांनी कोल्हापूरवरील आपले विशेष प्रेम व्यक्त करताना कोल्हापूर महापालिकेला कोट्य़वधींचा निधी मंजूर केला. नगरोत्थान योजनेतून 237 कोटी रूपये, नगरविकास विभागातर्फे मूलभूत सुविधांसाठी 15 कोटी आणि रंकाळा तलावासाठी दहा कोटींचा भरीव निधी दिला. रंकाळा तलावासाठी शिंदे यांनी तब्बल दहा कोटींचा भरीव निधी मंजूर केला. यात रंकाळा तलावासाठी मंजूर केलेल्या निधीत महापालिकेने तीस टक्के रक्कम भरावी अशी राज्यशासनाची अट होती. पण शिंदे यांनी ती रद्द करत शंभर टक्के निधी देण्याचा राजेश क्षीरसागर यांचा आग्रह मान्य केला. त्याचबरोबर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्य़गृह, खासबाग कुस्ती मैदान, सुबराव गवळी तालीम मंडळ यासह कोल्हापूरचे वैभव असणाऱ्या विविध ठिकाणांच्या विकासासाठीही शिंदे यांनी पाहणी करून निधी दिला आहे.

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी सकारात्मक असणारा नेता
ठाणे शहराच्या हद्दवाढीत महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबतही गेल्या अडीच सकारात्मक भूमिका घेतली होती. हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी महापलिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिले होते. आता शिंदेच मुख्यमंत्री झाल्याने हद्दवाढीच्या मागणीला बळ मिळणार असून हद्दवाढ झाली तर शहर विकासाला चालना मिळणार आहे.

Related Stories

जतमध्ये “पहिल्या, माडग्याळ मेंढी यात्रेला” सुरुवात

Sumit Tambekar

केंद्रानंतर आता राज्यानेही केली पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

datta jadhav

केएसआरटीसी नीरज चोप्राला देणार आजीवन ‘गोल्डन पास’

Abhijeet Shinde

“…अन्यथा कोकणवासीय ‘कोल्हापुरी चप्पल’ हातात घेऊन नवाब भाईंचं स्वागत करतील..!”

Abhijeet Shinde

पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचा आदमापुरात उत्साहात प्रारंभ

Abhijeet Shinde

43 हजार कोटींना विकले IPL मीडिया राईट्स

datta jadhav
error: Content is protected !!