Tarun Bharat

तीन्ही सेनादलांचे प्रमुख पंतप्रधान मोदींच्या भेटणार

अग्नीवीर योजनेची माहिती आणि कार्यक्रम विशद केला जाणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज मंगळवारी भारताच्या तीन्ही सेनांच्या प्रमुखांची चर्चा होणार आहे. या चर्चेत अग्नीवीर योजनेसह अनेक महत्वाच्या मुद्दय़ांवर विचारविमर्श केला जाईल. तीन्ही सेनाप्रमुख पंतप्रधान मोदींना अग्नीवीर योजनेच्या सविस्तर माहिती देणार आहेत. तसेच, या योजनेअंतर्गत लवकरच हाती घेण्यात येणाऱया सैन्यभरती कार्यक्रमाचाही विचार केला जाणार आहे.

तीन्ही सेनाप्रमुख स्वतंत्ररित्या पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. आपल्या अधिपत्यातील विभागांच्या आवश्यकता आणि अग्नीवीर सैनिकांची भरती हे विषय प्रामुख्याने चर्चिले जातील, अशी माहिती देण्यात आली. येत्या जुलैपासून अग्नीवीरांची भरती सेनादलांमध्ये करण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ होणार आहे. सेनादलांनी या भरतीचे वेळापत्रक आणि टप्पे निश्चित केले आहेत.

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बैठक

या बैठकीला देशात अग्नापथ योजनेच्या विरोधात होणाऱया आंदोलनांची पार्श्वभूमी आहे. गेले चार दिवस प्रामुख्याने बिहार व इतर काही राज्यांमध्ये सेनेत प्रवेश घेणाऱया इच्छुकांकडून आंदोलन चालविले जात आहे. बिहारमध्ये चार रेल्वेगाडय़ांना आग लावण्यात आली होती. तसेच इतरत्रही दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. गेले दोन दिवस हिंसाचार झालेला नाही. तथापि सोमवारी या योजनेविरोधात भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती आहे.

 आंदोलनाविषयीही चर्चा शक्य

तीन्ही सेनाप्रमुख अग्नीपथ योजनेविरोधातील आंदोलनाची चर्चाही पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत करण्याची शक्यता आहे. हे आंदोलन काही गैरसमजुतीतून होत असावे, किंवा त्याच्या पाठीशी काही समाजविरोधी शक्तींचे बळ असावे, असेही बोलले जात आहे. या सर्व बाबी सरकारी पातळीवर विचाराधीन असून कारवाईही केली जात आहे. भरती प्रक्रिया मात्र यामुळे प्रभावित होऊ शकणार नाही.

उलटसुलट मते

अग्नीपथ या योजनेसंबंधी तज्ञांमध्ये उलटसुलट मते आहेत. काही तज्ञांच्या मते ही योजना सेनादलांवर विपरीत परिणाम करु शकते. तसेच त्यांच्या कार्यक्षमतेशी पेलेली ही तडजोड आहे. मात्र, विद्यमान सेनाधिकाऱयांनी या योजनेचे ठाम समर्थन केलेले असून ही योजना सेनादलांना अधिक तरुण बनविणार असून युवकांनीही संधी देणारी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

Related Stories

राज्यांनी पेट्रोलियम पदार्थांवरील व्हॅट कमी करावा

datta jadhav

जुळय़ांना जन्म, एकालाच लागण

Patil_p

सिंधियांच्या सन्मानार्थ 100 रुपयांचे नाणे जारी

Omkar B

गुजरातमध्ये टेडी बियर स्फोट, नवविवाहित गंभीर जखमी

Amit Kulkarni

जम्मू-काश्मीर परिसीमन : सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Patil_p

भारताकडून मालदीवला 25 कोटी डॉलर्सची मदत

Patil_p