स्पाईसजेट’च्या पटना-दिल्ली उड्डाणाची दुर्घटना टळली
पटना / वृत्तसंस्था
बिहारमधील पटना विमानतळावर रविवारी मोठी विमान दुर्घटना टळली. पटना येथून दिल्लीला जाणाऱया स्पाईसजेटच्या विमानात अचानक आग लागली. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला पक्ष्याची धडक बसल्यामुळे इंजिनला आग लागल्याचा दावा केला जात आहे. तसेच तांत्रिक बिघाडाचे कारणही पुढे केले जात आहे. पायलटला बिघाडाची जाणीव होताच त्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केल्याने सर्व प्रवासी बचावल्याने सुटकेचा निःश्वास टाकण्यात आला. विमानाला आग लागली तेव्हा 185 प्रवासी विमानात होते असे सांगण्यात येत आहे. इंजिनला आग कशामुळे लागली हे तपासानंतरच स्पष्ट होईल, असे अधिकाऱयांचे म्हणणे आहे.
विमानतळ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. विमान टेक ऑफ करत असताना इंजिनला आग लागली. विमानाच्या सुरक्षित लँडिंगनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे वक्तव्य समोर आले आहे. विमानात पक्षी आदळल्यानंतर हवेतच एक इंजिन बंद पडल्याचे सांगण्यात आले. यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या दुर्घटनेदरम्यान सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे पटनाचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी सांगितले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला आग लागली. अभियंत्यांचे पथक पुढील तपास करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेनंतर दुपारी चार वाजता दुसऱया विमानाने सर्व प्रवाशांना दिल्लीला पाठवण्यात आले.
स्पाईसजेटच्या विमान एसजी-723 च्या इंजिनला रविवारी पटना विमानतळावर आग लागली. विमान पटनाहून दिल्लीला जात होते. रविवारी दुपारी 12.03 वाजता विमानाने उड्डाण केले. टेक ऑफ करत असतानाच डाव्या पंखाला जोरात आग लागली. 22 मिनिटांनी (दुपारी 12ः25) पायलटने जाणीवपूर्वक विमान विमानतळावर उतरवले. आग लागल्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. आगीमुळे इंजिनमधून धूर येत होता, असे प्रवाशांकडून सांगण्यात आले.