फुजियानसारखी विमानवाहू युद्धनौका जगात एकच ः तंत्रज्ञानाबद्दल जग साशंक
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनचे नौदल लवकरच स्वतःची तिसरी विमानवाहू युद्धनौका ‘फुजियान’ला स्वतःच्या ताफ्यात सामील करणार आहे. ही विमानवाहू युद्धनौका इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लाँच सिस्टीमने युक्त असल्याचा चीनचा दावा आहे. या युद्धनौकेला समुद्रातील अमेरिकेच्या वर्चस्वासाठी आव्हान मानले जातेय. परंतु चीन स्वतःच्या सैन्यसामर्थ्याबद्दल अतिशयोक्तीपूर्ण दावे करत असल्याचे सर्व देश ओळखून आहेत.
अशा स्थितीत चीनकडून फुजियान विमानवाहू युद्धनौकेबद्दल केला जाणारा दावाही संशयाच्या भोवऱयात आहे. फुजियान एअरक्राफ्ट स्टीम एनर्जीने (वाफेची शक्ती) संचालित होते. तर आण्विक ऊर्जेने संचालित अमेरिकेच्या नौदलाची सुपरकॅरियर गेराल्ड फोर्ड अद्याप इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लाँच सिस्टीमचा अंतर्भाव करू शकलेली नाही.
हिंद-प्रशांत क्षेत्रात अमेरिकेच्या सैन्यशक्तीला फुजियान हे प्रत्युत्तर असल्याचा चीनचा दावा आहे .परंतु भारतीय नौदलाचे ऍडमिरल या विमानवाहू युद्धनौकेच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. वाफेच्या शक्तीवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लाँच सिस्टीम कशी हाताळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुठल्याही विमानवाह युद्धनौकेवरून लढाऊ विमान लाँच करण्यासाठी एका विशेष प्रकारच्या यंत्रणेची गरज असते. विमानवाहू युद्धनौकेवरील धावपट्टी ही जमिनीवरील धावपट्टीपेक्षा छोटी असते. याचमुळे विमानवाहू युद्धनौकेवर विमानाचे लँडिंग आणि लाँचसाठी एका विशेष प्रकारच्या यंत्रणेचा वापर केला जातो, ज्याला कॅटोबार सिस्टीम म्हटले जाते. कुठल्याही विमानवाहू युद्धनौकेवरून लढाऊ विमान लाँच आणि रिकव्हर करणे हे या यंत्रणेचे काम असते. ही यंत्रणा दोन प्रकारची असते, पहिली स्टीम कॅटापल्ट जी सध्या बहुतांश युद्धनौकांमध्ये वापरली जाते. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लाँच सिस्टीम दुसऱया प्रकारची यंत्रणा आहे.