दोन वर्षांपूर्वी उपग्रहीय छायाचित्राद्वारे खुलासा : गावामध्ये आता घरांची निर्मिती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भूतानमार्गे भारताची कोंडी करण्याची तयारी चीन करत असल्याचा खुलासा उपग्रहीय छायाचित्रांद्वारे झाला आहे. चीनने डोकलामपासून 9 किलोमीटर अंतरावर भूतानच्या अमो चू खोऱयात गाव वसविले असल्याचे यातून समोर आले आहे. भूतानच्या भूभागात असलेल्या या गावाचे नाव चीनने ‘पंगडा’ ठेवले आहे. या गावाच्या उभारणीची छायाचित्रे नोव्हेंबर 2019 मध्ये समोर आली होती आणि आता हे गाव पूर्णपणे वसविण्यात आले आहे. जवळपास प्रत्येक घराबाहेर कार दिसून येत
आहे.
पंगडानजीकच ऑल वेदर रोड असून चीनने भूतानच्या भूमीवर कब्जा करत हा मार्ग तयार केला आहे. हा मार्ग वेगवान प्रवाह असलेल्या अमो चू नदीच्या काठावर असून हा भाग भूतानच्या हद्दीत 10 किलोमीटर आत आहे. डोकलाममध्ये 2017 साली चीन अन् भारतीय सैन्य समोरासमोर उभे ठाकले होते. चीन अमो चू खोऱयात गाव वसविण्यासह रस्तेनिर्मिती करत आहे. हे खोरे चिनी कब्जातील भूतानच्या सर्वात मोठय़ा भागापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. या भागावर चीनने मागील वर्षी कब्जा केला होता. या घडामोडींमुळे सिक्कीममध्ये भारतीय सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे.
भारतावर पडणार प्रभाव
या निर्मितीकार्याचा भारतावर प्रभाव पडणार आहे. अमो चूनजीक निर्मितीकार्यामुळे चिनी सैन्य सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण डोकलाम पठारावर सहजपणे पोहोचू शकते. यामुळे चीन भारताच्या संवेदनशील सिलीगुडी कॉरिडॉरपर्यंत पोहोचू शकतो. सिलीगुडी कॉरिडॉर ईशान्येतील राज्यांना उर्वरित देशाशी जोडणारा असल्याने त्याचे मोठे महत्त्व आहे. भारतीय सैन्याने चिनी कामगारांना 2017 मध्ये डोकलाममधील झाम्पेरी रिजवर पोहोचण्यापासून रोखले होते. चीन आता पर्यायी मार्गाने तेथे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
झाम्पेरी रिजवर कब्जाचा प्रयत्न
पंगडा गाव आणि त्याच्या उत्तर तसेच दक्षिण दिशेला असलेले झाम्पेरी रिज तसेच डोकलाम पठारावर कब्जा करण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे हे नवे उदाहरण असल्याचे सुरक्षा तज्ञांचे मानणे आहे. अमो चू नदीच्या काठावरील दुसरे गाव पूर्णपणे तयार झाले आहे. तर दक्षिण दिशेला असलेल्या तिसऱया गावात निर्मितीकार्ये सुरू आहेत. तिसऱया गावानजीक नदीवर एक पूलाची निर्मिती करण्यात आल्याचे उपग्रहीय छायाचित्रांमध्ये दिसून येते. अमो चू खोऱयात चीनच्या निर्मितीकार्याबद्दल भूतानचे राजदूत मेजर जनरल वेत्सोप नामग्याल यांनी टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. तर विदेश मंत्रालयाने यासंबंधी कुठल्याही प्रकारचे वक्तव्य केलेले नाही.
चिकन नेक कॉरिडॉर
चीन भूतानच्या बळकावलेल्या भूभागांमध्ये गाव, रस्ते आणि सुरक्षा सुविधा निर्माण करत भारताच्या विरोधात स्वतःची सैन्यक्षमता मजबूत करत आहे. या निर्मितीकार्यांद्वारे चीन भारतासाठी सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण चिकन नेक कॉरिडॉरसाठी धोका ठरू पाहत असल्याचे तज्ञांचे मानणे आहे.