माजी पंतप्रधान ओलींना इशाऱयावर नाचविले : वादग्रस्त महिला राजदूताने गुंडाळला गाशा
वृत्तसंस्था / काठमांडू
चीनने नेपाळमधील स्वतःच्या वादग्रस्त महिला राजदूत हाओ यांकी यांना पदावरून हटविले आहे. हाओ यांकी या चिनी अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या एक वोल्फ वॉरियर होत्या, ज्या स्वतःच्या सौंदर्याच्या बळावर नेपाळमध्ये ड्रगनचा प्रभाव वाढवू पाहत होत्या असे मानले जाते. चिनी राजदूत हाओ यांनी केपी शर्मा ओली हे पंतप्रधान असताना एकप्रकारे त्यांना स्वतःच्या इशाऱयांवर नाचविल्याचे मानले जाते. चिनी राजदूताने दिलेल्या चिथावणीवरच ओली यांनी नेपाळचा वादग्रस्त नकाशा प्रसिद्ध केला होता. या नकाशात भारताचे भूभाग कालापानी अन् लिपुलेख हे नेपाळमध्ये दर्शविण्यात आले होते. पंतप्रधान असताना ओली यांनी भारताच्या विरोधात वारंवार गरळ ओकली होती. नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान ओली यांचे कार्यालय अन् निवासस्थानी त्या वारंवार ये-जा करत होत्या.
हाओ यांकी यांच्या प्रयत्नानंतरही चीनला नेपाळच्या निवडणुकीत ओली आणि प्रचंड या दोन्ही गटांना एकत्र आणत संयुक्त डावी आघाडी निर्माण करण्यास अपयश आले होते. राजदूत अपयशी ठरल्यावर चनीने स्वतःचा एक मोठा नेता नेपाळमध्ये पाठविला होता, तरीही चीनला निराशाच पत्करावी लागली होती.
2017 च्या इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी आणि केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वात पुन्हा चीनधार्जिणे सरकार स्थापन करावे असा ड्रगनचा प्रयत्न आहे. 2017 मध्ये चीनने प्रचंड अन् ओली यांच्यात तडजोड घडवून आणत सरकार स्थापन करविले होते. परंतु काही काळानंतर ही आघाडी तुटली आणि प्रचंड यांनी नेपाळी काँग्रेसशी हातमिळवणी केली होती.
निवडणुकीची पार्श्वभूमी
केपी ओली यांच्या जागी शेरबहादुर देउबा हे नेपाळचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी भारतासोबत निर्माण झालेला तणाव दूर करण्याची भूमिका घेतली. हाओ यांकी स्वतःच्या मिशनमध्ये सातत्याने अपयशी ठरल्यावर चीनने आता नेपाळमधील निवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना नव्या राजदूताची घोषणा केली आहे. चेंग सेंग हे चीनचे नेपाळमधील नवे राजदूत असणार आहेत. चेंग सध्या चीनच्या विदेश मंत्रालयात उपसंचालक आहेत. हाओ यांकी या ऑक्टोबरमध्येच चीनला परतल्याचे मानले जाते. चेंग यांनी मागील काही महिन्यांमध्ये नेपाळच्या मुत्सद्यांची अनेकदा भेट घेतली आहे.
चीनचा सॉफ्ट पॉवर चेहरा
ओली यांच्या कार्यकाळादरम्यान चीनच्या राजदूताला नेपाळमधील सर्वात शक्तिशाली विदेशी मुत्सद्दी म्हणून ओळखले जात होते. हाओ यांकी यांनी पाकिस्तानात काम केले होते आणि त्यांना उर्दू भाषा अवगत आहे. यांकी या चीनच्या सॉफ्ट पॉवरचा चेहरा म्हणून कार्यरत होत्या. चीनचे प्रभुत्व जगभरात निर्माण करण्याची जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षा पाहता एक वोल्फ वॉरियरप्रमाणे त्यांनी काम केल्याचे गुप्तचर यंत्रणांचे मानणे आहे.