गरोदर पत्नीला खांद्यावर उचलून पेटत्या निखाऱयांवर चालण्याची परंपरा
अनेक देशांमधील परंपरा अजब किंवा विचित्र वाटतात. या परंपरांवर अनेक लोकांची मोठी श्रद्धा असते. अशीच एक विचित्र परंपरा चीनमध्ये असून तेथे पती स्वतःच्या गरोदर पत्नीला खांद्यावर उचलून घेत पेटत्या निखाऱयावर चालत असतो.
चीनमध्ये अनेक प्रकारच्या चित्रविचित्र परंपरांचे पालन होते. तेथे युलिन डॉग मीट फेस्टिव्हलही आयोजित केला जातो, ज्यावर जगभरातून टीका होत असते. अशाच प्रकारे आईवडिल होऊ घातलेल्या दांपत्याला अजब परंपरेचे पालन करावे लागते. पत्नी गरोदर राहिल्यास तिला उचलून घेत पतीला अनवाणी पायांनी पेटत्या निखाऱयांवर चालावे लागते.


गरोदरपणाच्या 9 महिन्यांदरम्यान पत्नींचा मूड स्विंग होत असतो. त्यांची प्रकृती देखील ठीक राहत नाही तसेच अनेक प्रकारच्या असुविधांना त्यांना तोंड द्यावे लागते. त्यानंतर प्रसूतीच्या वेदनाही त्यांना सहन कराव्या लागतात. अशा स्थितीत पत्नीला उचलून घेत पेटत्या निखाऱयावर चालून पती गरोदरपणाच्या पूर्ण प्रवासात आपण सोबत आहोत हे दाखवून देण्यासाठी या परंपरेचे पालन करत असतो.
काही लोकांचा नसतो विश्वास
पतीने या परंपरेचे पालन केल्यास जन्माला येणारे बाळ सुदृढ असते असे मानले जाते. तसेच चीनचे अनेक लोक या परंपरेचे पालन करण्यास नकार देतात. पेटत्या निखाऱयावर आपण चालल्याने पत्नीला होणारा त्रास कमी होत नसल्याचे अशा लोकांचे मानणे आहे.