ऑनलाईन टीम/तरुण भारत
अमेरिकेच्या (America) प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर चीनने निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शुक्रवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने माहिती दिली. तसेच, चीनच्या सरकारी मीडिया हाऊस CGTN ने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, पेलोसी त्यांच्या आशिया दौऱ्यादरम्यान तैवानच्या दौऱ्यावर होत्या. यावरून चीन (China) नाराज आहे. तर पेलोसी यांच्या तैवान (Taiwan) दौऱ्यानंतर चीनने मोठा गदारोळ केला. तर नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीला चीन आपल्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप मानत आहे. तसेच, या कारणामुळे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग चांगलेच नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्याशिवाय, तैवान स्वतःला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून सादर करतो आणि चीनवर विस्तारवादी असल्याचा आरोप करतो.
जगातील बहुतेक मोठे देश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तैवानच्या भूमिकेशी सहमत आहेत. त्यामुळे चीनच्या नाराजीत आणखी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे म्हणणे आहे की, शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीन व्लादिमीर पुतिनने जे केले ते तैवानशी करण्याचा प्रयत्न करीत आहे.
हे ही वाचा : शिवसेना-भाजप युतीबाबत केसरकरांचा गौप्यस्फोट ; म्हणाले, राणेंमुळे युती…
तैवानमधून नॅन्सी पेलोसीच्या बाहेर पडल्यानंतर, चीनने तैवानच्या आसपासच्या पाण्यात प्राणघातक क्षेपणास्त्रे डागली आहेत. मात्र, ही क्षेपणास्त्रे त्यांच्या लष्करी सरावाचा एक भाग असल्याचे चीनचे म्हणणे आहे. पण बीजिंग तैवानला त्याच्या लष्करी सामर्थ्याची भीती दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याचे अमेरिकेचे मत आहे. तर अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे संतप्त झालेल्या चीनने आता युरोपियन युनियनमधील सात देशांच्या राजदूतांना बोलावले आहे.