गोरखा जिल्ह्य़ात काटेरी कुंपणाद्वारे अतिक्रमण : अधिकारी मात्र अनभिज्ञ
वृत्तसंस्था /काठमांडू
चीन शेजारी देशांची भूमी बळकाविण्याच्या स्वतःच्या विस्तारवादी धोरणापासून दूर जात नसल्याचे चित्र आहे. याच्याच अंतर्गत तो सातत्याने नेपाळच्या भूमीवर अवैध अतिक्रमण करत आहे. चीनने दोन वर्षांपूवीं नेपाळमध्ये गोरखा जिल्ह्य़ातील रुइलामध्ये सैन्यतळ निर्माण केले होते, आता तेथे चीनने काटेरी कुंपण घालून अतिक्रमण अधिकच वाढविले आहे.
हिमालयीन क्षेत्रात अद्याप नेपाळ आणि चीनदरम्यान सीमा निश्चित झालेली नाही. चीन याचाच लाभ घेत हळूहळू नेपाळच्या अंतर्गत भागांमध्ये घुसखोरी करत आहे. या कृत्याला नेपाळचे लोक सातत्याने विरोध करत आहेत. परंतु सरकारी अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दर्शवित आहेत.
सीमेवर कुठल्याही प्रकारच्या विकासकार्याकरता दोन्ही देशांची अनुमती आवश्यक आहे. परंतु चीन नेपाळच्या भूमीवर कुठलीही अवैध निर्मिती करत असल्याची कुठलीच माहिती नसल्याचा दावा नेपाळच्या विदेश मंत्रालयाच्या अधिकाऱयाने केला आहे. 4 महिन्यांपूर्वी नेपाळ सरकारचा एक गुप्त अहवाल उघड झाला होता. चीन नेपाळच्या दोन सीमावर्ती भागांवर कब्जा करतोय हे यात नमूद होते. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी नेपाळच्या दोन जिल्हय़ांमध्ये घुसखोरी करून तेथे पायाभूत सुविधांची निर्मिती करत आहे. दोन्ही देशांदरम्यान हिमालयाला लागून सुमारे 1400 किलोमीटरचा सीमावर्ती भाग आहे. 1960 मध्ये दोन्ही देशांदरम्यान सीमेवरून अनेक करार झाले होते. परंतु चीन आता हुमलासह अन्य एका जिल्हय़ात असलेले स्तंभ हटवून तेथे अतिक्रमण करत आहे. मागील वर्षी हा वाद समोर आल्यावर नेपाळ सरकारने तेथे टास्क फोर्स पाठविला होता.