अब्दुल रहमान मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात अडथळा
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सुरक्षा परिषदेच्या जागतिक दहशतवादी यादीत पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याचा समावेश चीनने पुन्हा एकदा रोखला आहे. भारत आणि अमेरिकेने अल-कायदा प्रतिबंध समिती अंतर्गत मक्कीला जागतिक दहशतवादी म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव आणला होता. तथापि, चीनच्या व्हेटोनंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात अडथळा आला आहे. चीनच्या व्हेटोनंतर भारत-अमेरिकेचा प्रस्ताव लागू होऊ शकला नाही. चीनने याआधीही जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्मया मौलाना मसूद अझहर याला नामनिर्देशित करण्याचा प्रस्तावही रोखून धरला होता.
भारत आणि अमेरिकेने जूनमध्ये पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला अल-कायदा आणि आयएसआयएल प्रतिबंध समिती अंतर्गत सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भारत आणि अमेरिकेने यापूर्वीच मक्कीला दहशतवादी घोषित केले आहे. यापुढील प्रक्रियेचा एक भाग म्हणून 16 जून रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांना हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
हाफिज सईदचा मेहुणा मक्की
मक्की हा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि 26/11चा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मेहुणा आहे. भारतातील अनेक दहशतवादी हल्ले, दहशतवाद्यांची भरती, विशेषतः जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांशी मक्कीचा संबंध आहे. 1 जानेवारी 2008 रोजीचा सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ला, 12-13 फेब्रुवारीला करण नगर, श्रीनगरमध्ये झालेला हल्ला, 2018 मध्ये गुरेझ आणि बांदीपोरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही मक्कीचे नाव आले होते.