अन्य देशांना आपल्या प्रभावाखाली आणण्यासाठी चीनकडून नेहमीच वेगवेगळय़ा युक्त्या आणि क्लृप्त्या योजिल्या जातात, हे नेहमीचेच आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांना चीनने पैशाच्या जोरावर अंकित करून ठेवले आहे. आता चिनी भाषेचा उपयोग शस्त्रासारखा करून ब्रिटन आणि युरोपियन देशांमध्ये आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न चीन करत असल्याचे दिसून येत आहे.
भाषेच्या माध्यमातून चिनी संस्कृती या देशांमध्ये प्रबळ आणि प्रभावी करण्याची चीनची योजना आहे, असा आरोप ब्रिटनमधील स्थानिक नेत्यांनी केला आहे. चीनी भाषेला मंडारीन असेही संबोधिले जाते. ब्रिटनमधील 70 शाळांमधून 6000 हून अधिक ब्रिटीश विद्यार्थ्यांना चीनी भाषा शिकविली जात आहे. ही भाषा शिकविण्यासाठी ब्रिटनमध्ये 30 संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थांसाठी चीनकडून आर्थिक साहाय्य दिले जाते. ते 80 हजार कोटी रुपये इतके मोठे आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत असणारे नेते ऋषी सुनक यांनीही हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून पंतप्रधान झाल्यास सर्व चीनी भाषा शिकविणाऱया संस्थांवर बंदी घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. चीन भाषेच्या माध्यमातुन ब्रिटनला आपल्या पंखाखाली घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला जात आहे. एकंदर आता आपले उपद्रवमूल्य सिद्ध करण्यासाठी चीनकडून भाषेच्या माध्यमाचा उपयोगही केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.