दोन्ही देशातील तणाव वाढण्याची चिन्हे
तैपेई / वृत्तसंस्था
रशियाने युपेनवर केलेल्या हल्ल्यानंतर आणखी एका युद्धाची चर्चा जागतिक पातळीवर सुरू आहे. चीन तैवानभोवती आपली लढाऊ विमाने आणि युद्धनौका पाठवून तणाव वाढवण्याचे काम करत आहे. तैवानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने देशभरातील संरक्षणस्थितीचा आढावा घेतल्यानंतर 17 चिनी लष्करी विमाने आणि तीन नौदल जहाजे ठाण मांडून असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन दिवसात चीनच्या तीन लढाऊ विमानांनी तैवानच्या एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनमध्ये (एडीआयझेड) घुसखोरी केल्याचे दिसून आले आहे.
पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स (पीएलएएएफ) ची 17 लष्करी विमाने आणि पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही (पीएलएएन) ची तीन जहाजे तैवानच्या आसपास तैनात आहेत. या विमानांपैकी एका विमानाने मध्यवर्ती भाग ओलांडल्याचेही दिसून आले आहे. चिनी विमानांकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी तैवानने हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे.
तैवानच्या मुद्दय़ावरून सतत वाढत चाललेल्या तणावादरम्यान इंडोनेशियातील जी-20 शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली असली तरी त्यांच्यात झालेली चर्चा उघड करण्यात आलेली नाही.