चीनची हेर असल्याचा संशय : बौद्ध भिक्षूचा धारण केला होता वेश
वृत्तसंस्था / बोधगया
बिहारच्या बोधगया येथील कालचक्र मैदानानजीकच्या परिसरात चिनी महिला सोंग शियाओलनला पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला बौद्ध भिक्षूच्या वेशात होती. ही महिला चीनसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय आहे. दलाई लामा यांच्या सुरक्षेकरता मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या महिलेची पोलीस कसून चौकशी करत असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जे. एस. गंगवार यांनी सांगितले आहे. तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांच्याबद्दल धमकी दिल्याप्रकरणी या चिनी महिलेला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. दलाई लामा यांचे कालचक्र मैदानात गुरुवारपासून तीन दिवसीय प्रवचन सुरू झाले आहे. चिनी महिलेला याच परिसरातून अटक करण्यात आली आहे.
चिनी महिलेसंबंधी गुप्तचर यंत्रणेकडून माहिती कळताच पोलिसांनी गुरुवारी सकाळी तिचे रेखाचित्र जारी केले होते. त्यानंतर पोलिसांनी या महिलेचा शोध सुरू केला होता. विविध ठिकाणी तिचा शोध घेतला जात होता. अखेर गुरुवारी संध्याकाळी उशिरा या महिलेला ताब्यात घेण्यास यश आले आहे.
दलाई लामा हे सध्या बोधगयामध्येच आहेत. त्यांच्या कार्यक्रमात 50 हून अधिक देशांमधून सुमारे 2 लाख बौद्ध भाविक सामील होण्याची शक्यता आहे. दलाई लामा यांच्यावर पाळत ठेवण्याचे काम चिनी महिला करत होती. संबंधित चिनी महिला 2019 मध्ये देखील भारतात पोहोचली होती. त्यानंतर ती चीनमध्ये परतली होती, मग पुन्हा ती भारतात दाखल झाली आणि त्यानंतर नेपाळमध्ये गेली होती. नेपाळमध्ये काही दिवस वास्तव्य केल्यावर चिनी महिला बोधगयामध्ये पोहोचली होती. या महिलेवरून गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला होता. तर सुरक्षा यंत्रणांची नजर या चिनी महिलच्या हालचालींवर होती.
दलाई लामा यांना नुकसान पोहोचविण्याचा या महिलेचा कट असल्याचे मानले जात होते. तिबेटचे धर्मगुरु असलेल्या दलाई लामा यांना चीनचा विरोध आहे. दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतल्यापासून चीन सातत्याने त्यांच्या विरोधात कट रचत आहे.