साडेसात तासांमध्ये चंदीगड ते आसामपर्यंतचे 1910 किमी अंतर पार
वृत्तसंस्था / चंदीगड
भारतीय वायुदलाचे हेलिकॉप्टर सीएच-47एफ (1) चिनूकने सोमवारी भारतात सर्वात लांबीच्या उड्डाणाचा विक्रम केला आहे. चिनूक हेलिकॉप्टरने चंदीगडहून आसामच्या जोरहाटसाठी नॉनस्टॉप उड्डाण केले आहे. 1,910 किलोमीटरचे अंतर साडेसात तासांमध्ये न थांबता पूर्ण करून चिनूकने नॉन स्टॉप सर्वात अधिक अंतरासाठी उड्डाण करण्याचा विक्रम केला आहे.
चिनूक हेलिकॉप्टच्या या उड्डाणाने सर्वांना चकित केले आहे. देशात पहिल्यांदाच कुठल्याही हेलिकॉप्टरने ही कामगिरी केली आहे. चिनूक हेलिकॉप्टरने अशक्य ते शक्य करून दाखविले आहे. या हेलिकॉप्टरने पुन्हा एकदा स्वतःची क्षमता सिद्ध केली असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे. भारताने चिनूक हेलिकॉप्टर्स अमेरिकेकडून खरेदी केली आहेत.
सैनिक आणि सैन्यसामग्रीची वाहतूक करण्यासाठी चिनूक या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. कुठल्याही संकटादरम्यान बचावकार्यात हे हेलिकॉप्टर महत्त्वाची भूमिका बजावते. पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान या हेलिकॉप्टरचा भारतीय सैन्याला मोठा उपयोग झाला असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱयाने सांगितले आहे.
भारतीय वायुदलाकडे सध्या 15 चिनूक हेलिकॉप्टर्स आहेत. सप्टेंबर 2015 मध्ये भारताने वायुदलाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी अमेरिकेकडून 15 चिनूक खरेदीचा करार केला होता. या कराराचे मूल्य सुमारे 3.1 अब्ज डॉलर्स इतके होते. चिनूक 11 टन वजनाची सामग्री आणि 45 सशस्त्र सैनिकांना नेण्यास सक्षम आहे.