वृत्तसंस्था/ पोश्चेफस्ट्रुम (दक्षिण आफ्रिका)
येथे सुरु असलेल्या आयसीसीच्या पहिल्याच 19 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर सिक्स फेरीतील दुसऱया सामन्यात भारतीय महिला संघाने लंकेचा 7 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारतीय महिला संघाला रविवारच्या सामन्यात बलाढय़ ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
लंका आणि भारत यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंकेने 20 षटकात 9 गडी बाद 59 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 7.2 षटकात 3 बाद 60 धावा जमवित आपला विजय नोंदविली. भारतीय महिला संघाची या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल चालू असून त्यांना तत्पूर्वीच्या सामन्यात मोठय़ा फरकाने विजय मिळविणे आवश्यक असल्याने त्यांनी लंकेविरुद्धच्या सामन्यात दर्जादार कामगिरी केली. भारतीय संघातील फिरकी गोलंदाज पार्शवी चोप्राने आपल्या 4 षटकामध्ये केवळ 5 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद केले. त्यामध्ये तिने 1 षटक निर्धावही टाकले. चोप्राने आपल्या गोलंदाजीत लंकेची कर्णधार गुणरत्ने हिला त्रिफळाचीत केले. गुणरत्नेने 28 चेंडूत 2 चौकारांसह 25 धावा जमविल्या. यानंतर चोप्राच्या फिरकी गोलंदाजीसमोर लंकेची स्थिती 9 बाद 59 अशी शेवटच्या षटकाअखेर झाली. ऊमाया रत्नायकेने 36 चेंडूत 13 धावा जमविल्या. भारतातर्फे चोप्राने 4 तर मनत काश्यपने 16 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताने 7.2 षटकात 3 बाद 60 धावा जमविल्या. सौम्या तिवारीने 15 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 28 धावा तर शेफाली वर्माने 15 धावा जमविल्या. लंकेतर्फे विजरत्नेने 34 धावात 3 गडी बाद केले. भारताने या स्पर्धेत सुपर सिक्स फेरीत गुणतक्त्यात 6 गुण मिळविले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांनी प्रत्येकी 4 गुण घेतले आहेत.
संक्षिप्त धावफलक – लंका 20 षटकात 9 बाद 59 (गुणरत्ने 25, रत्ननायके 13, चोप्रा 4-5, काश्यप 2-16), भारत 7.2 षटकात 3 बाद 60 (सौम्या तिवारी नाबाद 28, शेफाली वर्मा 15, विजरत्ने 3-34).