मडगाव : गेले काही दिवस भाजपचे गुणगान गात असलेल्या बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी काल प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शंभरावा ‘मन की बात’ कार्यक्रम पाहिला. त्याच बरोबर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनीही मन की बात कार्यक्रम कुडतरी मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांसमवेत पाहिला. हा कार्यक्रम पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना आमदार आलेक्स सिक्वेरा म्हणाले की, हा एक चांगला उपक्रम असून आपल्या देशाचे पंतप्रधान थेट जनतेशी संवाद साधत आहे. सरकारच्या योजनांची व उपक्रमांची माहिती ते जनतेला देत आहेत. त्याच बरोबर जनतेला काय अपेक्षित आहे याचा आढावा घेऊन ते पुढे जात आहे. चर्चिल आलेमाव यांनी ही कुडतरीच्या भाजपच्या कार्यकर्त्यांसमवेत मन की बात कार्यक्रम पाहिला. यावेळी त्यांनी कुडतरी हा माझा मतदारसंघ असून येथून आपण कधीही निवडून येऊ शकतो. भाजप मध्ये प्रवेश केला नसला तरी भाजपचे काम आपल्याला आवडते. भाजप सर्वधर्म समानता मानणारा पक्ष असल्याची प्रतिक्रीया प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. यावेळी त्यांनी कुडतरीचे विद्यमान आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्यावर टीका केली. यावेळी कुडतरी मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते अथॅनथी बार्बोझा व डॉ. स्नेहा भागवत इत्यादी उपस्थित होते. अथॅनी बार्बोझा म्हणाले की, पक्षाने जर चर्चिल आलेमाव यांना उमेदवारी दिली तर आपण तसेच कुडतरी भाजप मंडळ एक दिलाने त्यांच्यासाठी कार्य करणार आहे. डॉ. स्नेहा भागवत म्हणाल्या की, भाजप मध्ये उमेदवारी देण्याची एक शिस्त आहे. त्या प्रमाणे पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याच्या सोबत पक्षाचे कार्यकर्ते काम करतील.
काँग्रेसची मार्मिक टीका
चर्चिल आलेमाव यांनी पहिल्यादाच ‘मन की बात’ कार्यक्रम पाहिल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी मार्मिक टीका करताना म्हटले की, चर्चिल आलेमाव यांच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे रक्त होते. त्यानंतर त्यांना पीडीएफ, युजीडीपी, सेव्ह गोवा, टीएमसी व एनसीपी असा राजकीय आजार बळावला त्याचे रक्त भेसळयुक्त झाले आणि आत्ता भाजपचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून उपचार करून घेतल्यानंतर त्याचे रक्त पूर्णपणे दूषित झालेले आहे.