वृत्तसंस्था/ पुणे
बालेवाडीच्या क्रीडा संकुलामध्ये 31 डिसेंबरपासून टाटा खुली महाराष्ट्र एटीपी टूरवरील 250 टेनिस स्पर्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये एटीपीच्या क्रमवारीतील पहिल्या शंभरमधील 16 टेनिसपटूंचा सहभाग राहील, अशी माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे.
क्रोएशियाचा 17 वा मानांकित मॅरिन सिलिकला या स्पर्धेत एकेरीच्या मानांकनात अग्रस्थान देण्यात आले आहे. सदर स्पर्धेच्या यापूर्वीच्या दोन एडिशन्स फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात घेण्यात आल्या होत्या. पण आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्राच्या वेळापत्रकानुसार जानेवारीत ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा खेळविली जात असल्याने टाटा खुल्या महाराष्ट्र टेनिस स्पर्धा ही टेनिसपटूंना सरावासाठी महत्त्वाची आहे. या स्पर्धेतील यजमानपद महाराष्ट्र लॉन टेनिस संघटनेकडे असून टाटा उद्योग समूहाने ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे. क्रोएशियाच्या मॅरिन सिलिकने 2009 आणि 2010 साली या स्पर्धेत अजिंक्मयपद पटकाविले होते. तसेच त्याने 2018 साली या स्पर्धेत उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. सिलिकने 2014 साली अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती.
31 डिसेंबरपासून बालेवाडीच्या क्रीडा संकुलात सुरू होणाऱया या स्पर्धेत अव्वल 16 टेनिसपटूंसह सुमारे 100 टेनिसपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या एकेरीच्या ड्रॉमध्ये आघाडीच्या 50 टेनिसपटूंपैकी 5 अव्वल टेनिसपटूंचा सहभाग राहील. नेदरलँडचा बोटिक व्हॅन झेंडस्कल्प याला 35 वे मानांकन, फिनलँडच्या रुसू होरीला 40 वे मानांकन, अर्जेंटिनाच्या सेबेस्टियन बायेझला 43 वे मानांकन, अमेरिकेच्या ब्रुक्स बायला 48 वे, स्लोव्हाकियाच्या मॉलकेनला 50 वे मानांकन देण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पात्रफेरी टप्प्याला 31 डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून प्रमुख ड्रॉ तील सामने 2 ते 7 जानेवारी दरम्यान खेळविले जातील.