रॅम्बो सर्कसमध्ये पाहता येणार खेळ
बेळगाव : पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नागरिकांना हसविण्यासाठी रॅम्बो सर्कस पुन्हा एकदा बेळगावमध्ये दाखल होत आहे. गोवावेस येथे अग्निशमन कार्यालयासमोर सर्कसचा तंबू घालण्यात येत आहे. जोकरच्या गंमती जंमती, जादूचे खेळ, कुत्रा, ससा, पोपट यांच्या कवायती पाहता येणार आहेत.
यापूर्वी सीपीएड मैदानावर रेम्बो सर्कस आली होती. त्यावेळी येथील नागरिकांनी या सर्कसला तुफान प्रतिसाद दिला होता. त्याच काळात जेमिनी सर्कस बेळगावमध्ये आली होती. परंतु त्यानंतर कोरोनामुळे सर्कस आली नाही. आता सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतर सर्कस पुन्हा दाखल झाली आहे.
येत्या काही दिवसात गणेशोत्सव असल्याने होणारी गर्दी लक्षात घेऊन सर्कस बेळगावमध्ये आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना सर्कसचा आनंद घेता येईल. सर्कसमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. नवीन कवायती, जोकरच्या गंमती जंमतींचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वीच्या काळी जंगली प्राण्यांचाही सर्कसमध्ये समावेश असायचा. परंतु सरकारच्या नियमानुसार जंगली प्राण्यांचे खेळ थांबविण्यात आले.
3 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या दरम्यान सर्कस बेळगावमध्ये असणार असून, दररोज 3 शो होणार आहेत. दुपारी 1, सायं. 4 व 7 वा. असे 3 शो होणार आहेत. काऊंटरवर व ऑनलाईनही तिकीट बुकींग केले जात आहे.