Tarun Bharat

कडोलीत गटारी तुंबून नागरिक त्रस्त

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : दुर्गंधीने नागरिक हैराण : ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया

वार्ताहर /कडोली

कडोली गावात जल मिशन योजनेंतर्गत संथगतीने चाललेले काम, सांडपाण्याने भरलेल्या गटारी, सार्वजनिक ठिकाणी आणि प्रमुख पेठ गल्लीसह अनेक गल्ल्यांमध्ये पसरलेली अस्वच्छता यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

पावसाळय़ात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने  स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे होते. परंतु यावषी गावात ठिकठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसून येत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने सारेच त्रस्त झाले आहेत.

जल मिशन योजनेंतर्गत गावात सहा महिन्यांपासून संथगतीने काम सुरू असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण केलेल्या रस्त्यात खोदाई करून पाईपलाईन घातली जात आहे. खोदाई केलेले रस्ते पुन्हा दुरुस्त केले जात नाहीत. परिणामी दगड-माती बाजूच्या गटारीत फेकून दिली आहे. त्यामुळे गटारींतील पाणी निचरा होत नाही, अशी परिस्थिती अनेक भागात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पाणी गटारीत साचून दुर्गंधी पसरत आहे. या सांडपाण्याचा नागरिकांना नाहक त्रास होत असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला फटका बसत आहे.

स्वच्छता मोहिमेचे काय होणार?

राज्य शासनाच्या सॉलिड ऍण्ड लिक्वीड वेस्ट मॅनेजमेंट योजनेंतर्गत संपूर्ण राज्यभरात प्रत्येक घरातील केरकचऱयाची उचल व्हावी, यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक बादली वाटप करण्याचा निर्णय झाला आहे. कडोली ग्रामपंचायतवतीने या योजनेचा शुभारंभही करण्यात आला. परंतु घरचा केरकचरा उचल होणार असला तरी सार्वजनिक ठिकाणचा आणि गल्लीतील रस्त्याच्या बाजूला टाकलेल्या कचऱयाचा प्रश्न मार्गी केव्हा लावणार? याचे नियोजन ग्रामपंचायत करणार काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. श्रावणमासाला प्रारंभ झाला आहे. यापुढे महत्त्वाचे सण तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत सर्वत्र घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य असल्यामुळे त्यांचा त्रास सहन करावा लागणार असल्याने तातडीने गटारी साफ कराव्यात, कचऱयाची विल्हेवाट योग्यप्रकारे लावावी, अशी मागणी होत आहे.  येथील नूतन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या बाजूला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शिवाय लक्ष्मी गल्ली, कलमेश्वर गल्ली, मारुती गल्ली, मायाण्णा गल्ली, पेठ गल्ली, सावकार गल्ली आदी गल्ल्यांतून गटारी तुंबल्या आहेत. तेव्हा त्यांची तातडीने साफसफाई करणे गरजेचे आहे. 

गटारीवर झाकण घाला

येथील श्री हनुमान मंदिरासमोरील चौकातील भर रस्त्यावर गटारीवर झाकण नसल्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी गटारीवरील झाकण दृष्टीस पडत नसल्याने अपघात घडत आहेत. तेव्हा ग्रामपंचायतीने लक्ष घालून गटारीवर झाकण बसविण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

लाल बटाटा दराने घडविला इतिहास

Patil_p

बाळेकुंद्री खुर्द परिसरात रंगपंचमी साजरी

Amit Kulkarni

स्मार्ट रोडवरील गाळय़ाला 33 हजार रुपये सर्वाधिक बोली

Patil_p

संसार-नाती जपण्यात महिला आघाडीवर

Amit Kulkarni

काळय़ा फिती बांधून विद्युत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Patil_p

तालुक्यातील 63 हजार जनावरांच्या कानांवर टॅग

Patil_p