कॅन्टोन्मेंट मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडून अपमान
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डतर्फे बीफ मार्केट व मटण मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. मात्र याबाबत काही अडचणी निर्माण झाल्याने नागरिकांनी कॅन्टोन्मेंटचे सीईओ आनंद के. यांना भेटण्याचा प्रयत्न सोमवारी केला. मात्र सीईओंनी भेटण्यास नकार देऊन कक्षात गेलेल्या नागरिकांना हाकलून दिले. त्यामुळे कॅन्टोन्मेंट सीईओंच्या वर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
कॅन्टोन्मेंट बोर्डचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येतात. मटण मार्केट आणि बीफ मार्केटमधील गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत संपली आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने भाडेकरारावर देण्यासाठी सोमवारी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. सोमवारी सकाळी कॅन्टोन्मेंट कार्यालयात लिलाव प्रक्रियेची तयारी केली होती. मात्र भाडेकरारातील काही त्रुटींचे निवारण करण्यासाठी नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद के. यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. कॅन्टोन्मेंटचे माजी सदस्य रिजवान बेपारी यांच्या नेतृत्वाखाली काही नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद के. यांच्या कक्षात प्रवेश केला. मात्र त्यांनी कक्षात प्रवेश करण्यास आक्षेप घेऊन केवळ रिजवान यांना प्रवेश दिला. रिजवान यांच्यासोबत आलेल्या नागरिकांना कक्षातून हाकलून दिले. केवळ एकटय़ालाच प्रवेश असल्याचे सांगून कक्षात येण्यास मज्जाव केला.
आनंद के. यांच्या वर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त करून कॅन्टोन्मेंटच्या महसूल विभागाच्या कर्मचाऱयांकडे तक्रार केली. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी नागरिकांचा अपमान केल्याची टीका केली. कॅन्टोन्मेंट कर्मचाऱयांव्यतिरिक्त अन्य नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यास नेहमीच असमर्थ असतात. कक्षामध्ये नागरिकांसह पत्रकारांनाही भेटण्यास टाळाटाळ करीत असतात. सोमवारी मात्र त्यांनी सर्व हद्दी पार करून चक्क कक्षात आलेल्या नागरिकांना हाकलले. या बेजबाबदार वर्तणुकीबद्दल संताप व्यक्त होत आहे.