पक्षांतराचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत हा संदेश देण्याचा हेतू : कुतिन्हो
प्रतिनिधी / मडगाव
निवडून आलेल्या आमदारांच्या पक्षांतराच्या विरोधात अनेक नागरिकांनी पक्ष-धार्मिक भेद ओलांडून लोहिया मैदान, मडगाव येथे निदर्शने केली. पक्षांतर झाल्यास दुसऱया लढाईची तयारी असे संदेश असलेले फलक हातात घेऊन नागरिकांनी सर्व आमदारांना आणि विशेषतः मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना इशारा दिला.
मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी दिलेल्या हांकेला प्रतिसाद देऊन प्रा. जॉन रिबेलो, राधा कवळेकर, अँथनी डिसिल्वा यांच्यासह निक कुलासो, जॅक मास्करेन्हस, डॉमनिक कुतिन्हो, जॉन बॉर्रेटो, लोयोला रॉड्रिग्स, इफ्तियाज सय्यद, ऑर्लांदो रॉड्रिग्स, उमरान पठाण, महेश नाईक, सलीम शेख, एडविन लॉरेन्स, अब्दुल मतीन, लिओ मोंतेरो आणि इतर नागरिक यावेळी उपस्थित होते.
प्रसारमाध्यमांसोबत बोलताना कुतिन्हो म्हणाले की, हा विरोध आयोजित करण्याचा एकमेव उद्देश लोभी आमदारांना असा स्पष्ट संदेश देण्याचा आहे की, लोक पक्षांतराचे असे प्रयत्न सहन करणार नाहीत. आम्ही या निषेधासाठी लोहिया मैदानाची निवड केली आहे, कारण येथूनच गोव्याच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली होती आणि येथूनच आम्हाला पक्षांतरांविरुद्ध क्रांती सुरू करायची आहे, असा त्यांनी खुलासा केला.
निवडणुकीपूर्वी मंदिर, चर्च, मशिदीमध्ये शपथा घेणारे व निवडून आलेले आमदार आता आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी जात असल्याचे चित्र दाखवून स्वार्थासाठी पक्षांतर करू पाहत आहेत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. 2019 मध्ये मागच्या पक्षांतराच्या वेळी, लोकांनी मौन बाळगले आणि कटू अनुभव गिळला. यावेळी परिस्थिती तशी राहणार नाही आणि पक्षांतर करू पाहणाऱयांनी हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे, असा इशारा कुतिन्हो यांनी दिला. मडगावचे आमदार कामत यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नाबद्दल प्रा. रिबेलो यांनी नाराजी व्यक्त केली. कामत ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करत आहेत त्या पक्षाची विचारधारा लक्षात घेऊन आम्हा मडगावच्या जनतेने त्यांना मतदान केले होते. आता जेव्हा ते पूर्णपणे विरोधाभासी विचारसरणीच्या पक्षात सामील होऊ इच्छितात तेव्हा ते मडगावकरांच्या पाठीत वार करण्यापेक्षा जास्त घातक आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी पक्षांतराच्या विरोधात निषेधाचा हा कार्यक्रम गोव्यातील सर्व मतदारसंघांत नेण्याचे ठरविण्यात आले.