कटरने हल्ला, दोघेजण जखमी : तरुणीच्या छेडछाडीचे प्रकरण : कॉलेज रोडवरील घटना
प्रतिनिधी /बेळगाव
विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. सोमवारी सायंकाळी कॉलेज रोडवर ही घटना घडली असून कटरने झालेल्या हल्ल्यात दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. रात्री उशीरापर्यंत कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
श्रीहरी तवगमठ (वय 19, रा. गोटगुद्दी), परशराम गाडीवड्डर (वय 20, रा. घटप्रभा) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. श्रीहरीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे तर परशरामवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहे. कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली.
धर्मवीर संभाजी चौक ते सिटी पोलीस लाईनपर्यंत विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होती. तरुणीच्या छेडछाडीवरुन ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. यंदेखूट परिसरातील एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांच्या दोन गटात ही हाणामारी झाली आहे. सुरूवातीला कॉलेज गेटसमोर किरकोळ वादावादी झाली.
त्यानंतर धर्मवीर संभाजी चौक परिसरात दोन्ही गटातील विद्यार्थी पोहोचले. यापरिसरात हाणामारीची घटना घडली. तेथून सिटी पोलीस लाईनकडे जाणाऱया मार्गावरही या विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होती. सोमवारी रात्री कॅम्प पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. अद्याप एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
हाणामारी करणारे तरुण एकाच समाजाचे आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये झालेली हाणामारीच्या घटनेनंतर कॉलेज रोड परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.