बार्सेतील सौरउर्जेवर चालणाऱया एकाच पंपाचे आजी-माजी आमदारांकडून दोनदा उद्घाटन


वार्ताहर /केपे
केपे मतदारसंघातील बार्से पंचायत क्षेत्रात पिण्याच्या पाण्याकरिता बसविण्यात आलेल्या सौरउर्जेवर चालणाऱया पंपावरून राजकारण बरेच तापले असून या कामाचे श्नेय आजी -माजी आमदारांकडून घेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातून दोन वेळा याचे उद्घाटन करण्याचा प्रकार घडला आहे.
केपे मतदारसंघातील काही ग्रामीण भागांत उन्हाळा सुरू होताच पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे बाळ्ळी ते बार्सेपर्यंत सुमारे 35 कोटी रु. खर्च करून जायकामार्फत पाईपलाईन टाकण्यात आली आहे व त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले होते. यामुळे बाळ्ळी पंचायतीतील बेंदुर्डे, खड्डे या भागांत पाण्याची सोय झाली आहे. मात्र पाडी येथे काही तांत्रिक अडचणी आल्याने पुढे पाणीपुरवठा झालेला नाही.
दुसऱया बाजूने केव्हाही वीजपुरवठा खंडित झाला, तर पाणीपुरवठा सुविधा खंडित होऊ नये याकरिता हर घर नल या योजनेच्या अंतर्गत 8 ठिकाणी सौरउर्जेच्या साहाय्याने पाणीपुरवठय़ाचा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्याची चाचणी म्हणून तीन ठिकाणी सुरुवातही करण्यात आली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत केपे मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत कवळेकर हे पराभूत झाले व काँगेसचे एल्टन डिकॉस्ता आमदार म्हणून जिकून आले. त्यानंतर आजी-माजी आमदारांमध्ये या पिण्याच्या पाण्याच्या सुविधांसंदर्भात श्रेय घेण्याकरिता रस्सीखेच सुरू झाली आहे.
अनेक ठिकाणी या कामांचे श्रेय घेण्याचे प्रयत्न दोघांकडूनही झाले. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या सेवा सप्ताहाच्या निमिताने केपे भाजप मंडळाच्या सोबत जाऊन माजी उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी बार्से येथे सौरउर्जेवर चालणाऱया पंपाचा शुभारंभ केला व आपल्या कार्यकाळात पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण झाल्याचे म्हटले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत विद्यमान आमदार डिकॉस्ता यांनी बार्से येथे जाऊन याच प्रकल्पाचा शुभारंभ केला व आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता व विधानसभेत हा प्रश्न काढला होता, याकडे लक्ष वेधले.
एकाच प्रकल्पाचा दोन वेळा शुभारंभ करून आजी-माजी आमदारांकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न झालेला दिसत आहे. सध्या लहानसहान गोष्टींवरून श्रेय घेण्याचे प्रयत्न केपे मतदारसंघात होताना दिसत आहेत. त्यात पाण्यावरून सुरू झालेले राजकारण येणाऱया दिवसांत बरेच ताणण्याची शक्मयता नाकारता येणार नाही. कारण काही दिवसांनी पंचायत निवडणुका होणार आहेत.