ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जम्मू काश्मीरमधील सिधरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाला यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सिधरा भागातून एका ट्रकमध्ये दहशतवादी जात असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने तत्काळ एक टीम तयार करुन दहशतवाद्यांना घेराव घातला. ट्रकमधील दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले असता त्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले.
ठार झालेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे असून, दोघांची ओळख पटविण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. लतीफ लोन आणि उमर नजीर अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. तर तिसऱयाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. लतीफ लोन हा जम्मू-काश्मीरच्या शोपियांमधील असून, तो काश्मिरी पंडित पुराण कृष्ण भटच्या हत्येत सहभागी होता. तर उमर नजीर नेपाळच्या तिल बहादुर थापाच्या हत्येत सहभागी होता. या दहशतवाद्यांकडून एके 47 रायफल्स आणि पिस्टल जप्त करण्यात आले आहे. या भागात सुरक्षा दलाकडून शोधमोहिम सुरू आहे.