गेल्या वर्षी विसर्जन केलेल्या श्रीमूर्ती बाहेर काढून स्वच्छता करण्याची मागणी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
गावाजवळील तलावात गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी कुंडांची बांधणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने पाहणी करून त्या कुंडामध्ये मागील वषी विसर्जन केलेल्या श्रीमूर्ती बाहेर काढून कुंडाची स्वच्छता करण्याची मागणी येथील पर्यावरणप्रेमी व गणेश भक्तांतून करण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नाने शासकीय निधीतून गावाजवळील तलाव व किगदी तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गावामध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जनाची कोणतीच सोय नसल्यामुळे नागरिक किगदी तलाव, मार्कंडेय नदीपात्रामध्ये किंवा विहिरींमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करत होते. त्यासाठी नागरिकांचा संपूर्ण दिवस वाया जात होता. गावाजवळील तलावाचे सौंदर्यीकरण करतेवेळी तलावाच्या पूर्व दिशेला गणेशमूर्ती विसर्जन कुंडाची निर्मिती करण्यात आली.
मागील वर्षी एका कार्यक्रमाद्वारे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत अनंत चतुर्दशीदिवशी गणेशमूर्ती विसर्जनाला सुरुवात करण्यात आली. यामुळे नागरिकांना घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन करणे सोयीचे झाले. गणेशोत्सव महिन्यावर येऊन ठेपल्याने मागील वर्षीच्या विसर्जन केलेल्या श्रीमूर्ती कुंडातून बाहेर काढून स्वच्छता करणे गरजेचे आहे.