इंडियन स्वच्छता लीगच्या माध्यमातून नोंदणीत 1300 हून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शनिवारी इंडियन स्वच्छता लीगच्या माध्यमातून व्हॅक्सिन डेपो आणि कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 1300 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता. या मोहिमेंतर्गत भारतात सर्वाधिक स्वयंसेवकांनी नोंदणी केल्याने राज्यात बेळगाव महानगरपालिका तिसऱया क्रमांकावर आहे.
शहरातील स्मारके, पर्यटन स्थळे, तसेच सार्वजनिक स्थळांवर निर्माण झालेले अस्वच्छतेचे साम्राज्य हटविण्यासाठी देशभरात इंडियन स्वच्छता लीगच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात आली. देशातील विविध राज्यांमध्ये या मोहिमेंतर्गत शनिवारी स्वच्छता मोहीम राबविली गेली. काही ठिकाणी बीच, पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, नदी पात्र तसेच मंदिरे अशा विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. बेळगाव महापालिकेच्या माध्यमातून विविध संघटनांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. इंडियन स्वच्छता लीगकरिता ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन स्वयंसेवकांना करण्यात आले होते. याकरिता 300 स्वयंसेवकांनी नोंदणी केली होती. राज्यात सर्वाधिक स्वयंसेवकांनी नोंदणी बेळगाव महापालिकेच्या माध्यमातून केली होती. मात्र, प्रत्यक्षात 1300 हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
व्हॅक्सिन डेपो आणि कणबर्गी येथे सिद्धेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून कचरा जमा करण्यात आला. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासह मनपाचे कर्मचारी या मोहिमेत बहुसंख्येने सहभागी झाले होते.