तुर्कियेचा विरोध मावळला ः रशियाचे वाढणार टेन्शन
वृत्तसंस्था/ अंकारा
युक्रेन युद्धादरम्यान रशियाची कोंडी करू पाहणाऱया नाटो देशांना मोठे यश मिळाले आहे. तुर्कियेने फिनलंड आणि स्वीडनला नाटोत सामील करण्याच्या निर्णयाला विरोध करण्याची भूमिका सोडून दिली आहे. यामुळे रशियाच्या या दोन्ह शेजारी देशांना नाटोत सामील करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परस्परांच्या सुरक्षा हितांचे रक्षण करण्यावर फिनलंड, स्वीडन आणि तुर्किय हे तिन्ही देश सहमत झाले आहेत. याचबरोबर तुर्कियेकडून मागील अनेक आठवडय़ांपासून सुरू असलेले नाटय़ संपुष्टात आले आहे. फिनलंड आणि स्वीडन नाटोत सामील झाल्याने उत्तर युरोपमध्ये आता रशियाचे टेन्शन वाढणार आहे.
फिनलंड, स्वीडन आणि तुर्कियेदरम्यान ही सहमती स्पेनच्या माद्रिद शहरात होऊ घातलेल्या शिखर परिषदेपूर्वी झाली आहे. या शिखर परिषदेत नाटोचे 30 सदस्य देश रशियाच्या विरोधात स्वतःच्या एकजुटतेचे प्रदर्शन करणार आहेत. तुर्कियेने हट्ट सोडल्याने परिषदेत निर्माण होणाऱया अवघड स्थितीपासून ही संघटना वाचली आहे. तुर्कियेने नकाराधिकार मागे घेतल्याने आता फिनलंड आणि स्वीडन दोन्ही देश नाटोत सामील होऊ शकतात. याचबरोबर आता दशकांनंतर युरोपच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे.
करारातील अटी
फिनलंड आणि स्वीडन दोन्ही देश दीर्घकाळापासून तटस्थ होते, परंतु युक्रेन युद्धादरम्यान आता या देशांनी स्वतःच्या भूमिकेत बदल करत नाटोत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. नाटोचे महासचिव जेन स्टोल्टेनबर्ग आणि तुर्कियेच्या अध्यक्षीय कार्यालयाने या कराराची पुष्टी दिली आहे. ही सहमती तुर्कियचे अध्यक्ष एर्दोगान, स्वीडनच्या पंतप्रधान मागडालेना अँडरसन आणि फिनलंडचे राष्ट्रपती सौली निनिस्तो यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीनंतर तयार झाली. तिन्ही देशांदरम्यान झालेल्या करारानुसार स्वीडन तुर्कियेच्या प्रत्यार्पणाच्या अर्जावर वेगाने काम करणार आहे. तसेच स्वीडन आणि फिनंलड दोन्ही देश स्वतःच्या कायद्यांमध्ये दुरुस्ती करत तुर्कियेसाठी धोका ठरलेल्या लोकांबद्दल कठोर भूमिका घेणार आहेत.
तुर्कस्तानचा आरोप
याचबरोबर दोन्ही देश तुर्कियेला शस्त्रास्त्रांची विक्री करण्यावर असलेली बंदी हटविणार आहेत. स्वीडन कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीला आश्रय देत असल्याचा आरोप तुर्कियेने केला होता. कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीने तुर्किये सरकार विरोधात 1984 मध्ये शस्त्र उचलले होते. फिनंलड आणि स्वीडन आता कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी विरोधात पूर्ण सहकार्य करतील असा दावा तुर्कियेने केला आहे.