दहा भाविकांचा मृत्यू ः काही बेपत्ता ः ओढय़ाला आलेल्या पुरामुळे बरेच तंबू पाण्याच्या प्रवाहात
श्रीनगर / वृत्तसंस्था
अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस बरसल्याने हाहाकार निर्माण झाला. ढगफुटीनंतर ओढय़ाला आलेल्या पुराचे पाणी भाविकांच्या तंबूंमध्ये घुसल्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. तसेच यावेळी धावपळ आणि चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेवेळी 10 ते 15 हजार भाविक गुहेजवळ उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात तीन महिलांसह दहा भाविकांचा मृत्यू झाला असून काहीजण बेपत्ताही आहेत. मात्र, जम्मू-काश्मीर पोलिसांचे आयजी विजय कुमार यांनीही जीवितहानीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी रेस्क्मयू टीम पोहोचल्यानंतर बचावाचे काम युद्धपातळीवर राबविण्यात आले.
अमरनाथ गुहेपासून एक ते दोन किलोमीटरच्या परिघात ढगफुटीची घटना घडली. डोंगरावरून आलेल्या जोरदार प्रवाहाने आलेल्या पाण्याने भाविकांसाठी उभारलेले सुमारे 25 तंबू आणि दोन लंगर वाहून गेले. पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय होऊन अनेकांच्या सामानाचे नुकसान झाले. घटनेनंतर लगेचच जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकाने लष्कर, आयटीबीपी, सीआरपीएफ, एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरू केले. ओढय़ाला आलेल्या पाण्यामुळे भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढणेही अवघड झाले होते. भाविकांच्या बचावासाठी हेलिकॉप्टरची मदतही घेण्यात आली. या दुर्घटनेनंतर काही लोकांना तंबूंमधून बचाव छावण्यांमध्ये हलविण्यात आल्याचे एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी सांगितले. यंदा अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरू झाली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून यात्रा न झाल्याने यंदा भाविकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे.
बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत
मुसळधार पावसानंतर अचानक टेकडय़ांवरून मोठय़ा प्रमाणात पाणी खाली आल्याचे बचाव पथकातील अधिकाऱयांनी सांगितले. पाण्याच्या प्रवाहामुळे सुमारे 25 तंबू आणि 2 लंगर उद्ध्वस्त झाले. आयटीबीपीच्या म्हणण्यानुसार जवळपास तासाभरानंतर पाऊस थांबला होता. मात्र रात्रीच्या अंधारामुळे मदत व बचावकार्यात मर्यादा येत होत्या. बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली. अनेक लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर जखमींना उपचारासाठी छावण्यांमध्ये नेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जखमींना अधिक उपचारार्थ विमानाने इस्पितळात हलवण्याचे प्रयत्न सुरू होते.
पोलिसांकडून दोघांच्या मृत्यूला दुजोरा
काश्मीर पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत पवित्र गुहेजवळ मुसळधार पावसामुळे अनेक लंगर पूर्णपणे नष्ट झाले असून पोलिसांनी दोघांच्या मृत्यूची पुष्टी दिली. तसेच राज्य पोलीस दलही बचावकार्यात सहभागी असल्याचे सांगितले आहे.