काही ठिकाणी पावसाचा शिडकावा
प्रतिनिधी / बेळगाव
मागील काही दिवसांपासून सातत्याने वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे मानवी जीवनावर याचा परिणाम होत आहे. कधी थंडी, कधी गरमी, कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाचा शिडकावा, अशा बदलत्या वातावरणाला तोंड द्यावे लागत आहे. मंगळवारी सकाळी काही भागात पावसाचा किरकोळ शिडकावा झाला तर दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते.
हिवाळ्dयातच ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाची चिन्हे निर्माण होत आहेत. त्यामुळे पावसाळ्याचा प्रत्यय येत आहे. विशेषत: ढगाळ वातावरणाचा मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. निरुत्साहीपणा, सर्दी-खोकला, ताप, डेकेदुखी आदी किरकोळ आजार बळावले आहेत. मागील आठवड्यात काहीशी थंडी जाणवत होती. मात्र ढगाळ वातावरणाने थंडीदेखील गायब झाली आहे.
ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी
नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये थंडीची तीव्रता अधिक असते. मात्र अद्याप म्हणावी तशी थंडी जाणवली नाही. थंडीची तीव्रता वाढेल, असे वाटत असताना ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी होत असलेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे थंडी कमी झाली आहे. विशेषत: वातावरण पूर्णपणे बदलले आहे. पहाटे धुके आणि किरकोळ थंडी तर दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री पावसाचा शिडकावा, असे वातावरण अनुभवावयास मिळत आहे.