सफाई कर्मचारी संघटनेने मानले आभार
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. त्यांना कोणत्याच सरकारी सुविधा दिल्या जात नाहीत. कायमस्वरुपी कर्मचारी म्हणून सामावून घ्यावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे कामबंद आंदोलन कर्मचाऱयांनी पुकारले. त्याची दखल मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी घेतली आणि येत्या तीन महिन्यांमध्ये सर्वांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेऊ, असे आश्वासन दिले. त्याबद्दल जिल्हा सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले आहे.
बेळगाव शहरामध्ये स्वच्छतेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कर्मचारी करत आहेत. मात्र त्यांना कोणत्याच सुविधा दिल्या जात नाहीत. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने हे कर्मचारी काम करतात. महापालिकेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने 548 कर्मचारी तर ऑफलाईन म्हणजेच कंत्राटदाराच्या नेतृत्वाखाली 551 कर्मचारी काम करत आहेत. या सर्वांनाच आता कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
याचबरोबर मुलांना मोफत शिक्षण इतर सरकारी सर्व सुविधा देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. प्रसूति काळात महिलांना सरकारी नियमानुसार रजा देखील दिली जाणार आहे. त्यामुळे निश्चितच या सर्व कर्मचाऱयांना मोठा फायदा होणार आहे. याबद्दल जिल्हा सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघेला, विजय निरगट्टी, मुनीस्वामी भंडारी, षण्मुख आदेंद्र आणि राजमोहन यांच्यासह इतर संघटनेच्या पदाधिकाऱयांनी आभार व्यक्त केले आहेत.