ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आपल्या 50 आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार आहेत. तेथील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या मंदिरात ते विशेष पूजा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
येत्या 15 नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या 50 आमदारांसह गुवाहाटीला जातील. या दौऱ्याची तयारी करण्यासाठी काही पदाधिकारी देखील गुवाहाटीला रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे आसामचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस कमिशनर अशा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत. सत्तांतराच्या काळात शिंदे यांना ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांना ते भेटणार आहेत. या दौऱ्यात कामाख्या देवीच्या मंदिरात विशेष पूजेचे नियोजन देखील करण्यात आले आहे.
अधिक वाचा : ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटणार
कामाख्या देवी ही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि तिचा प्रसाद भक्तांना इच्छित फळ देतो असं मानलं जातं. कामाख्या देवीवर मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी श्रद्धा आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे आपल्या आमदारांसह गुवाहाटीला मुक्कामी होते. तेव्हाही ते आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाचा विजय व्हावा यासाठी शिंदे हे त्या ठिकाणी विशेष पूजा करणार असल्याचे सांगण्यात येते.