ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात युतीचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मविआ सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान शिंदेंनी नगरविकास विभागाच्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती देऊन अजित पवारांना चांगलाच दणका दिला आहे. शिवसेनेच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी अभय दिलं आहे.
हेही वाचा- ठाकरे-शिंदे एकत्र येणार?; दिपाली सय्यद यांच्या ट्विटने चर्चांना उधाण
मुख्यमंत्री शिंदेंनी नगरविकास विभागाच्या मार्च ते जून २०२२ मध्ये मंजूर झालेल्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना अजित पवार (Ajit Pawar) निधी देत नाहीत, अशी तक्रार अनेक आमदारांनी केली होती. त्यानंतर आता शिंदेंनी सत्तेत आल्यावर हे बदल केलेलं दिसत आहे. दरम्यान, ९४१ कोटींपैकी एकट्या बारामती नगरपरिषदेला २४५ कोटींचं वितरण कऱण्यात आलं होतं. मात्र आता बारामतीतल्या कामांना स्थगिती मिळाल्याने हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.