Tarun Bharat

समोर या…राजीनामा देतो…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंडखोरांना आवाहन ः ‘वर्षा’ बंगला सोडून ‘मातोश्री’वर रवाना

प्रतिनिधी/ मुंबई

Advertisements

मुख्यमंत्री बुधवारी सायंकाळी 5 वाजता समाजमाध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधणार होते. परंतु 15-20 मिनिटे होऊन गेली तरी त्यांनी संवाद साधला नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर वाढता दबाव असल्याचे जाणवत होते. त्यातच शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनीही ठाकरे यांना पत्र लिहिले होते आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर विचार करण्याचे आवाहन केले होते. तांत्रिक अडचणींमुळे फेसबुक लाईव्ह येण्यात अडचणी येऊ लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र 15-20 मिनिटांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.

इथे येऊन बोला…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेन तर त्यांनी सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा इथे येऊन बोलायला काय हरकत होती, असा प्रश्न केला. त्यांच्यापैकी एकाने जरी सांगितले की ‘उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री नकोत’, तर आताच्या आता मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. आता फेसबुक लाईव्ह संपताच वर्षावरून माझा मुक्काम मातोश्रीवर हलवितो. मला कोणताही मोह नाही. मी ओढून-ताणून खुर्चीला चिकटून बसणारा नाही.  कुऱहाडीचा दांडा गोतास काळ ठरल्याचा अनुभव येत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

राजीनामा घेऊन तुम्हीच राजभवनावर जा

तुम्हाला नको असेन तर आज राजीनाम्याचे पत्र तयार करून ठेवत आहे. जे आमदार गायब आहेत त्यांनी माझ्या राजीनाम्याचे पत्र घेऊन राजभवनावर जावे. मला कोव्हिड झाल्याने मी राजभवनावर जाऊ शकत नाही, म्हणूनच हे आवाहन करत आहे. जोपर्यंत शिवसेनाप्रमुखांनी जोडून दिलेला साधा शिवसैनिक माझ्याबरोबर आहे, तोपर्यंत कोणत्याही संकटाला भीत नाही. आव्हानाला पाठ दाखविणारा नव्हे, तर मी आव्हानाला सामोरा जाणारा माणूस आहे, असा दावाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.

काय ते शिवसैनिकाने सांगावे

शिवसैनिकांना वाटत असेल की मी शिवसेनेचे नेतफत्व करायला नालायक आहे, तर पक्षप्रमुखपदही सोडायला तयार आहे. पण शिवसैनिकांनी सांगितले तर.. कोणाही फडतूस माणसाने येऊन सांगितले तर नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण मी पद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंदाने मान्य आहे. पण त्याही पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, दुसरा कोणीही मुख्यमंत्री असलेला चालेल तर तेही मान्य आहे, पण एकदा समोर येऊन सांगा. इकडून तिकडून सांगून नका. तसे करणार नसाल तर जोपर्यंत मी खुर्ची अडवून ठेवली आहे, तोपर्यंत काय होणार आहे?, असा प्रश्न त्यांनी बंडखोरांना उद्देशून केला.

तर फोन केलातरी चालेल

इकडे या किंवा यायला संकोच वाटत असेल तर फोन करून सांगा… मी या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. पदं येत असतात, पदं जात असतात, पद हे आयुष्याची कमाई नसते. पदावर बसल्यानंतर केलेली कामे आणि जनतेची प्रतिक्रिया ही आयुष्याची कमाई असते. गेल्या अडीच वर्षांत आपली भेट न होता कुटुंबातील असल्याप्रमाणे तुम्ही दिलेले प्रेम हीच आपल्या आयुष्याची कमाई असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही सांगत असाल तर आता मी पायउतार व्हायला तयार आहे. हे नाटक नाही, अशी परखड भाषाही त्यांनी वापरली.

आकडे कसे जमवता तेही महत्त्वाचे आहे

या लोकशाहीत संख्या ज्याच्याकडे जास्त आहे तो जिंकतो. पण ती संख्या प्रेमाने जमवता की धाकदपटशाने जमवता हेही महत्त्वाचे आहे. समोर उभी केल्यानंतर डोकी मोजली जातात आणि अविश्वास ठाराव मंजूर केला जातो. आता किती जण माझ्याबाजूने आणि माझ्याविरुद्ध मतदान करतील हे माहीत नाही. पण एकाने तरी माझ्याविरुद्ध मतदान केले तर माझ्यासाठी ते लाजीरवाणे असेल. माझ्यावर अविश्वास ठराव व्यक्त करण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यानी मला सांगावे. मी त्या नावाची कुठेही वाच्यता करणार नाही. मी माझे मन घट्ट करून बसलो आहे. जे प्रेम तुम्ही आजपर्यंत दिले ते कायम ठेवा, असे आवाहन शेवटी उद्धव ठाकरे यांनी केले.

होय, संघर्ष करणार ः राऊत यांचे ट्विट

मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे ट्विट बोलके आहे. ते म्हणतात की ‘होय, संघर्ष करणार..!’ एकीकडे मुख्यमंत्र्यांचे भावनिक आवाहन आणि दुसरीकडे संजय राऊत यांचे संघर्षाचे ट्विट यातून काय होणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

राजीनामा देण्याचा सर्वस्वी निर्णय उद्धवसाहेबांचाच

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला. यामध्ये शिवसैनिक भरडला गेला. एकीकडे घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.  असे त्यांनी म्हटले आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे.  आणि त्यांच्या राजीनाम्याचे म्हणाल तर राजीनाम्याचा निर्णय सर्वस्वी उद्धवसाहेबानांच घ्यायचा आहे, असे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Related Stories

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेसाठी तैनात डीसीपीला कोरोनाची बाधा

Rohan_P

कोरोनाचा उद्रेक : दिल्लीसह ‘या’ राज्यांमधील शाळा – कॉलेजेस आता पुन्हा बंद

Rohan_P

तिहार तुरुंगात दोन गटात सशस्त्र राडा, 15 कैदी जखमी

datta jadhav

केंद्र सरकारपाठोपाठ राज्यांकडून व्हॅटकपात

Patil_p

पतियाळा हिंसेचा सूत्रधार जेरबंद

Patil_p

जलसंधारणात उत्तर प्रदेश सर्वोत्तम

Patil_p
error: Content is protected !!